प्रतिनिधी,कोल्हापूर
Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, मराठ्यांना आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, मात्र जर ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे.सरकारने जर ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण दिले तर राज्यात उद्रेक होईल, सर्व ओबीसी समाज रस्त्यावर उतरून विरोध करेल, असा इशारा ओबीसी जनमोर्चाच्या वतीने बुधवारी देण्यात आला.नको कुणाच्या वाट्याचे … मिळवून आमच्या हक्काचे या घोषणेवर मराठा समाजाने ठाम राहावे, त्यांना आमचा पाठिंबा राहिल, असेही ओबीसी जनमोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
मराठा आरक्षणासाठी अंतरवाली जावळी (जि. जालना) येथे मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणानंतर राज्य सरकार संभ्रमात पडले आहे. राज्यातील वातावरणही बदलू लागले आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी ओबीसी जनमोर्चाच्या कोल्हापूर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.माजी महापौर नंदकुमार वळंजू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या पत्रकार परिषदेला माजी नगरसेविका उमा बनछोडे यांच्यासह जिह्यातील ओबीसी समाजाचे पदाधिकारी वसंत वठारकर,सुनिल गाताडे,रफीक शेख,शितल मंडपे,संभाजी पोवार,सयाजी झुंजार,दिगंबर लोहार,शिवाजी माळकर,दिलीप गवळी,मोहन हजारे,बाबासाहेब काशिद,किशोर लिमकर,शिवाजी साळोखे,तानाजी मर्दाने,विजय मांडरेकर,जयवंत वळंजू,राहूल माळी,लाड आदी उपस्थित होते.
यावेळी दिगंबर लोहार यांनी सांगितले, राज्य सरकारने मराठा समाजाता कुणबी समाजाचे दाखले देवून ओबीसी आरक्षणात घुसवायची प्रक्रिया सुरु झाली आहे.राज्यातील मागील चार मागासवर्गीय आयोगांनी मराठा समाजाला आरक्षण नाकारले आहे.सुप्रिम कोर्टाने मराठा जात ही सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या पुढारलेली असल्याने त्या जातीला कोणतेही आरक्षण देता येत नाही,असे स्पष्ट केले आहे. तरीही मराठा समाज कुणबी बनून ओबीसीत घुसखोरी करू पाहत आहे. याचा विरोध म्हणून ओबीसी संघटना एकत्र झाल्या आहेत.
नंदकुमार वळंजू म्हणाले, आधीच 52 टक्के ओबीसी लोकसंख्येला फक्त 27 टक्के आरक्षण असताना यामध्ये सर्व ओबीसी जातींना पुरेसा लाभ मिळत नाही.त्या ओबीसी आरक्षणात मराठा समाजाचा समावेश करणे म्हणजे या देशाला घडवणाऱ्या सेवाकरी ओबीसी समाजाला समानतेचा हक्क नाकारणे आहे.मराठा समाजाला अन्य कोणत्याही मार्गाने आरक्षण द्या,पण त्यांचा ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यासाठी समावेश केला तर त्याचे गंभीर परिणाम होतील,राज्यातील ओबीसीतील सर्व जाती रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत. त्याची सुरूवात कोल्हापुरातून होईल.
ओबीसी जनमोर्चाने मांडलेले मुद्दे
– मराठा आंदोलकांवर जालनात झालेल्या लाठीचार्जचा निषेध.
– मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नको या शरद पवारांच्या भुमिकेचे स्वागत.
– राजकीय नेते मराठा- ओबीसी वाद निर्माण करत आहेत.
– सत्ता, साधन आणि संपत्तीचे समान वाटप व्हावे.
– देशात, राज्यात जातवार जनगणना झाली पाहिजे.
– दुसऱ्या मार्गाने ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध
– कोर्टाचा अवमान म्हणून दावा दाखल करणार
– ओबीसीत 350 हून अधिक जातींचा समावेश
– प्रसंगी राज्यभरात आंदोलने,उपोषण करण्याचीही तयारी.
– नियोजनासाठी जिल्हा, तालुकास्तरावर बैठका
– जनमोर्चाचे नेते प्रकाश शेंडगेंच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांना भेटणार.









