ट्रकने साठ मीटरपर्यंत फरफटत नेली दुचाकी : शेमेचे आडवणचे नामदेव कांबळी जागीच ठार,दुचाकीवर मागे बसलेले शेट्यो गंभीर जखमी,जमावाने लिंक रोडच्या व्रेन्सला लावली आग,महामार्ग रोखून धरल्याने वाहतूक तासभर ठप्प
पेडणे : सुकेकुळण – धारगळ येथील रेल्वे पुलाजवळ मोपा विमानतळासाठीच्या ‘लिंक रोड’च्या कामासाठी असलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक देऊन सुमारे 60 मीटरपर्यंत फरफटत नेले. त्यात शेमेचे आडवण येथील नामदेव नारायण कांबळी (वय 64) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यामागे बसलेले काशिनाथ तुकाराम शेट्यो हे गंभीर जखमी झाले. या भीषण अपघातास कारणीभूत ट्रकचालक वसंत यादव (झारखंड) हा पळून गेला असून त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भीषण अपघातामुळे संतप्त झालेल्या जमावामध्ये मोठा उद्रेक झाला, परिणामी जमावाने वाहतूक रोखून धरली आणि रस्त्याचे काम करणाऱ्या व्रेन्सनाही आग लावण्यात आली. काल शुक्रवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या दरम्यान हा अपघात घडला. ‘लिंक रोड’चे काम करणाऱ्या मालवाहू ट्रकने सुकेकुळण येथे दुचाकीला समोऊन जोरदार धडक दिली. नामदेव नारायण कांबळी जागीच ठार झाले. काशिनाथ तुकाराम शेट्यो बाहेर फेकले गेल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातस्थळी संतप्त जमावाचा उद्रेक
या अपघातामुळे संतापलेल्या स्थानिकांनी अपघातस्थळी निदर्शने केली. एवढेच नव्हे तर लिंक रस्त्याच्या कामासाठी असलेल्या दोन क्रेन्सना आग लावली. ट्रकचा पुढील आरसा दगड घालून फोडण्यात आला. वातावरण तंग झाले होते. वातावरण नियंत्रणात ठेवण्यासाठी पेडणे पोलिसांनी मोपा, म्हापसा व अन्य भागातून पोलीस कुमक बोलाविली. मात्र पोलिसांना लोक जुमानत नव्हते.
आम्हाला न्याय हवा, आश्वासने नकोत
आम्हाला न्याय हवा, आश्वासने नकोत. यापूर्वीही चार अपघात होऊन चार जणांचे जीव याच लिंक रस्त्याच्या वाहतूक करणाऱ्या वाहनांनी घेतलेले आहेत. मात्र अजूनपर्यंत त्यापैकी कोणालाच न्याय मिळालेला नाही. अपघातास कारणीभूत असणारे ट्रकचालक अपघातानंतर पळून जातात. पोलिसही पुढे त्याबाबत संशयास्पद भूमिका घेतात. अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना योग्य तो न्याय मिळत नाही, असा आरोप करुन ग्रामस्थांनी पोलिसांवर रोष व्यक्त केला. संतप्त जमाव आणि पोलीस यांच्यात शाब्दिक बाचाबाची यावेळी झाली.
आमदार आर्लेकर आले घटनास्थळी
पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन संतप्त नागरिकांशी चर्चा केली. आर्लेकर यांचे म्हणणे जमाव ऐकून घेण्यास तयार नव्हता. अपघात करुन जो ड्रायव्हर पळून गेला त्याला घटनास्थळी आणा, अशी एकच मागणी जमावातील ग्रामस्थांनी आर्लेकर यांच्याकडे लावून धरली होती. जोपर्यंत ड्रायव्हरला आणत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, असे नागरिकांनी आमदारांना सांगितले. पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन, उपअधीक्षक चोडणकर तसेच पेडणे पोलीस निरीक्षक सचिन लोकरे, मोपा पोलीस निरीक्षक निनाद देऊलकर, पेडणे पोलीस उपअधीक्षक राजेश कुमार तसेच मोठ्या संख्येने पोलीस फौज उपस्थित होती.
तासभर रोखली महामार्गावरील वाहतूक
जमावाने राष्ट्रीय महामार्ग, जो मोपाला जातो तो रोखून धरला. यामुळे वाहतुकीचा सुमारे एक तास खोळंबा झाला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा आल्यानंतर पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी लोकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. आग लावलेल्या क्रेनची पेडणे अग्निशामक दलाच्या जवानानी आग विझविली. मात्र तोपर्यंत दोन्हीही क्रेन्स जळून खाक झाल्या होत्या.
आमदार आर्लेकर यांची शिष्टाई
आमदार प्रवीण आर्लेकर यांनी आपण योग्य तो न्याय स्थानिकांना आणि मयताच्या कुटुंबाला मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिले. मात्र तरीही नागरिक ऐकायला तयार नव्हते. मयत नारायण कांबळी यांचा मुलगा यावेळी घटनास्थळी होता. आपल्या वडिलांना न्याय द्या अशी आर्त हाक त्यांनी यावेळी आमदारांना दिली.
कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी
मोपा लिंक रोडचे काम युद्धपातळीवर सुरू असून या ठिकाणी कंत्राटदाराने आणलेल्या वाहनांना तसेच अत्याधुनिक यंत्रणा असलेल्या विविध प्रकारच्या वाहनांना परवाने नसल्याचा संशयही यावेळी नागरिकांनी व्यक्त केला. ज्या ट्रकने हा अपघात केला त्या ट्रकला मागून नंबर प्लेट नव्हती. हा ट्रक अत्यंत मोडकळीस आलेल्या स्थितीत होता, त्यामुळे त्यावर कारवाई करावी, अशी मागणी जमावाने यावेळी केली. कंत्राटदाराकडून मयत नामदेव कांबळी यांच्या कुटुंबाला योग्य तो मोबदला आपण मिळवून देणार आहे, असे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी सांगितल्यानंतर नागरिक शांत झाले. साईनाथ भोदजी म्हणाले की, यापूर्वी अशाच प्रकारचा अपघात या भागात झाला आणि एकाचा पाय मोडला. अन्य अपघातांमध्ये चारजण मृत्यू पावले. मात्र मयतांच्या कुटुंबांना मोबदला देण्यास कंपनीने टाळाटाळच केली. यापूर्वीही लिंक रस्त्याची क्रेन राष्ट्रीय महामार्गावर मधोमध आल्याने पुण्याहून आलेल्या चारचाकीला अपघात होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यावेळीही चालक पळून गेला होता. असे प्रकार वारंवार होत असून लोकांचे बळी जात आहेत. यावर उपाययोजनाही केली जात नाही, आणि मयतांच्या कुटुंबियांनाही न्याय मिळत नाही, असेही भोदजी म्हणाले.
सरकारी यंत्रणेकडून कंत्राटदाराला संरक्षण
वाहतूक खाते, वाहतूक पोलीस आणि पोलीस या कंत्राटदाराच्या वाहनांबाबत कानडोळा करत असल्याने असे प्रकार वारंवार घडत असल्याचे यावेळी संतप्त जमावातील नागरिकांनी पोलिसांना सांगितले. सर्वसामान्याला दंडात्मक कारवाई करणारे पोलीस मात्र या लिंक रस्त्याच्या ठेकेदाराच्या वाहनांबाबत कुठल्याही प्रकारच्या कागदपत्रांची मागणी करत नाहीत, असा आरोप यावेळी करण्यात आला. या वाहनांमुळे अनेकवेळा अपघात होऊन स्थानिक ग्रामस्थ मृत्युमुखी पडलेले आहेत. मात्र सरकारी यंत्रणा कुठल्याही प्रकारची पावले उचलत नाहीत, उलट ही सर्व सरकारी यंत्रणा या कंत्राटदारांची बाजू घेते आणि त्याच्या बचावासाठी काम करते, असा आरोप यावेळी नागरिकांनी केला.









