कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वेतील चोरीचे प्रकरण, पणजीतील पत्रकार परिषद दिलेली माहिती
प्रतिनिधी / मडगाव
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एका रेल्वे प्रवाशाकडून चोरण्यात आलेल्या 7 किलो सोन्यापैकी आतापर्यंत सुमारे 3 किलो सोने अर्थात सुमारे 2 कोटी रुपये किंमतीचा ऐवज तपास यंत्रणेने जप्त केलेला आहे. गोव्याचे पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग यांनी गुरुवारी पणजीत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस उपअधीक्षक गुरुदास कदम व पोलीस निरीक्षक सुनिल गुडलर उपस्थित होते.
गांधीधाम–तिरुनेलवेली हमसफर सुपरफास्ट एक्सप्रेस या रेल्वेतून मुंबईतील अशोक पाटील हा 4 कोटी रुपये किंमतीचे सोन्याचे नवे अलंकार घेऊन 1 / 2 मे 2023 रोजी प्रवास करीत होता. प्रवासात क्रॉसिंग करण्यासाठी म्हणून ही रेल्वे काणकोण रेल्वे स्थानकावर थांबली होती तेव्हा अशोक पाटील यांच्याकडून तो झोपेत असताना 4 कोटी किंमतीचे 7 किलो सोन्याचे दागिने असलेली ही बँग काढून घेऊन दोन आरोपी खाली उतरले आणि त्यानंतर मिळेल त्या वाहनाने ते काणकोण येथून अन्यत्र गेले. या प्रकरणातील आरोपी संदीप भोसले आणि आरोपी अक्षय चिनवाल यांनी हा कट प्रत्यक्ष अंमलात आणला होता.
त्या रेल्वेतून प्रवाशांचे किंमती सामान चोरणाऱ्या एका आंतरराज्य टोळीला पोलिसांनी जेरबंद करुन 4 कोटी दागिन्यांच्या चोरी प्रकरणाचा पर्दाफाश केला. पोलीस तपासात या टोळीकडून आतापर्यंत सुमारे 2 कोटी रुपये किंमतीचा ऐवज तपास यंत्रणने जप्त केलेला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ‘मधु ऑर्नामेंट्स’ या ज्वेलर्सकडून सोन्याचे तयार दागिने मुंबईहून दक्षिण भारतात डेलीव्हरी करण्यासाठी जाणार होते. या आस्थापनात 55 वर्षीय अशोक पाटील नावाचा कर्मचारी ऑफीस बॉय म्हणून काम करी. अशोक पाटील सुमारे 4 कोटी किंमतीचे हे दागिने अमूक दिवशी अमूक रेल्वेने डिलीव्हरी करण्यासाठी घेऊन जाणार होता. ही माहिती तळोजा –मुंबई येथील अर्चना उर्फ अर्ची मोरे (42) या महिलेला समजली. या टोळीमध्ये या महिलेसह सांगली परिसरातील संदीप भोसले (40), खानापूर –बेळगाव येथील अक्षय चिनवाल आणि परळ मुंबई यथील धनपत हंसराज बैड (44) यांचा समावेश होता. आरोपी अर्चना मोरे हिने 4 कोटीच्या दागिन्यांच्या प्रवासाची तारीख व इतर सविस्तर माहिती आपल्या इतर सहकाऱ्यांना पुरविली.
कोकण रेल्वे पोलीस अधीक्षक गुरुदास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक गुरुदास कदम, पोलीस निरीक्षक सुनिल गुडलर, हवालदार सत्यवान नाईक गावकर, श्रीनिवास रेड्डी, अमरदीप चौधरी, समीर शेख व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाचा इथपर्यंत तपास करण्यास साहाय्य केलेले असून उर्वरित ऐवजासंबंधी तपास चालू आहे.









