नागरी पुरवठा संचालक गोपाळ पार्सेकर यांचा दावा
प्रतिनिधी / पणजी
नागरी पुरवठा खात्याच्या गोदामातून चोरलेले धान्य जप्त केल्याचा दावा पोलिसांच्या गुन्हे शाखेने केला असला तरी, खात्याच्या गोदामातील धान्याची शिल्लक योग्य असल्याचे नागरी पुरवठा संचालक गोपाळ पार्सेकर यांनी म्हटले आहे.
सार्वजनिक वितरणासाठी आणलेला तांदूळ आणि गहू कर्नाटकात तस्करी करण्याच्या उद्देशाने नागरी पुरवठा खात्याच्या गोदामातून चोरल्याच्या आरोपावरून गुन्हे शाखेने मंगळवारी पाच जणांना अटक केली होती. त्यांच्याकडून तांदळाच्या 761 गोणी तांदूळ आणि 253 गोणी गहू तसेच दोन वाहने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आमच्या गोदामात सर्वकाही ठिक
त्यासंबंधी बुधवारी पार्सेकर यांना विचारले असता त्यांनी वरीलप्रमाणे प्रतिक्रिया दिली. खात्याला होत असलेला धान्य पुरवठा आणि विद्यमान साठा यात कोणतीही तफावत वा विसंगती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात खात्याच्या मालकीचे 11 गोदाम आहेत. त्या प्रत्येक गोदामातील साठय़ाचा तपशील मागवला आहे. आमच्या गोदामांमध्ये सर्व काही ठीक आहे. तांदूळ आणि गहू यांचा कोणताही तुटवडा आढळलेला नाही, असे पार्सेकर म्हणाले.
तरीही क्राईम ब्रँचच्या दाव्यानुसार नागरी पुरवठा खात्याच्या गोदामातून चोरीला जात असलेले धान्य त्यांनी जप्त केल्याचे म्हटले आहे, त्याबाबत पार्सेकर यांना विचारले असता, त्यासंबंधी आपण अनभिज्ञ असल्याचे ते म्हणाले. मात्र सर्व गोदामांतील नोंदी ’साठा’ आणि ’पुरवठा’ ठाकठिक आहेत, असे त्यांनी सांगितले.
या प्रकरणी गुन्हे शाखेने मंगळवारी पाच जणांना अटक केली आहे. त्यात हजरत सय्यद, विनय कुमार गुदिमनी, प्रकाश कोरीशेत्तर, तौसिफ मुल्ला आणि रामकुमार यांचा समावेश आहे. सचिन नाईक आणि वीरेंद्र म्हार्दोळकर हे दोन मुख्य संशयित फरार असल्याचे सांगण्यात आले. सदर संशयित नागरी पुरवठा खात्याच्या गोदामातून चोरलेले तांदूळ आणि गव्हाची तस्करी करत होते. फोंडा तालुक्मयातील स्वस्त धान्य दुकानासह तीन ठिकाणी छापे टाकण्यात आले होते.
अधिकाऱयांना वाचविण्यासाठी धावपळ
रेशन धान्य घोटाळ्याप्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने अटक केलेल्या 5 जणांव्यतिरिक्त दोन मुख्य आरोपीनी पणजीतील सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे.
गुन्हा अन्वेषण पोलिसांनी नागझर फोंडा येथे एका खाजगी गोदामावर छापे टाकून 5 जणांसह अनेक वाहने ताब्यात घेतली होती. नागरिपुरवठा खात्याच्या गोदामातील अन्नधान्यांची पोती कर्नाटकात नेऊन विकण्याचा डाव होता. या प्रकरणी दोन महत्वाच्या गुन्हेगारांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या अर्जावर आज सुनावणी होईल.
जप्त करण्यात आलेला धान्यसाठा सरकारी गोदामातील नव्हेच, असे दाखवण्यासाठी अधिकाऱयांची धावपळ सुरु झाली आहे. सरकारी पातळीवर असे प्रयत्न सुरु झाले आहेत. जेणेकरुन संबंधित खाते प्रमुख व इतर अधिकाऱयांना वाचविण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.









