‘रायसीना’ कार्यक्रमात तुलसी गॅबार्ड यांचे वक्तव्य
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ‘अमेरिका प्रथम’ हे धोरण केवळ अमेरिकेसाठी नव्हे, अशी स्पष्टोक्ती अमेरिकेच्या गुप्तहेर यंत्रणेच्या प्रमुख तुलसी गॅबार्ड यांनी केले आहे. त्या मंगळवारी येथील ‘रायसीना संवाद’ या परिषदेत भाषण करीत होत्या. भारत आणि अमेरिकेत अधिकाधिक सुदृढ संबंध असावेत, हेच अमेरिकेच्या सध्याच्या प्रशासनाचे धोरण आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
भारत आणि अमेरिका यांच्या संबंधांचा विस्तार होण्यासाठी प्रचंड अशी संधी आता उपलब्ध आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या दोन्ही नेत्यांनी दोन्ही देशांमधील संबंधांचे क्षितीज विस्तारण्यासाठी निश्चित स्वरुपाची पायाभरणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या महिन्यात अमेरिकेला भेट देऊन व्हाईट हाऊस येथे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा केली आहे. या चर्चेत दोन्ही देश एकमेकांच्या सहकार्याने कशी भविष्यातील वाटचाल करणार आहेत, याची रुपरेषा निर्धारित करण्यात आली आहे, अशीही महत्त्वपूर्ण माहिती तुलसी गॅबार्ड यांनी त्यांच्या भाषणात दिली आहे.
अमेरिका ‘अलोन’ नव्हे
अमेरिकेला अधिक सामर्थ्यवान बनविण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘अमेरिका फर्स्ट’ हे धोरण स्वीकारले आहे. मात्र, याचा अर्थ ते केवळ अमेरिकेचाच विचार करणार आहेत असा नाही. त्यांचे धोरण ‘अमेरिका अलोन’ किंवा फक्त अमेरिका असे मुळीच नाही. भारतानेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ‘भारत प्रथम’ हे धोरण स्वीकारले आहे. आपल्या देशाच्या विकासासाठी अशी धोरणे निर्धारित करावीच लागतात. तथापि, त्यांचा अर्थ तो देश केवळ त्याच देशाचा विचार करणार, इतर देशांचा विचार करणारच नाही, असा घ्यायचा नसतो. भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश एकमेकांच्या सहकार्याने अधिक बलवान होऊ शकतात. ही दोन्ही देशांसाठी संधी आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
मैत्री अधिक वाढणार
भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री आणि भागीदारी दिवसेंदिवस अधिकाधिक वाढणार आहे, असा माझा विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन जीवश्च कंठश्च मित्र आता पुन्हा एकत्र आले आहेत. दोन्ही नेत्यांची गेल्या महिन्यात व्हाईट हाऊस येथे झालेली भेट यासाठी महत्त्वाची ठरली आहे. ही भेट ऐतिहासिक आहे, अशीही मांडणी त्यांनी केली.
शांतता आणि सुरक्षा
जगात शांतता आणि सुरक्षा असावी हे अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचे प्रमुख धोरण आहे. या दोन तत्त्वांचा त्यांनी ध्यास घेतला आहे. त्यामुळे जगात जेथे संघर्ष आहे, तो मिटविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. शांतता आणि सुरक्षा यांच्या माध्यमातून सामर्थ्यसंपन्नता असा मार्ग त्यांनी स्वीकारला आहे. अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्वरित त्यांनी त्यांच्या कार्याचा प्रारंभ केला आहे. त्यांचे हेतू स्पष्ट आणि स्वच्छ आहेत, असेही प्रतिपादन तुलसी गॅबार्ड यांनी त्यांच्या भाषणात केले.









