ऑनलाईन टीम / तरुण भारत :
अजित पवार यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीत फूट पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यावर अजित पवार यांचे समर्थक आमदार अमोल मिटकरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आम्ही फुटीर नाही. आमचा पक्ष फुटलेला नाही, एकसंघ आहोत, असा दावा मिटकरी यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी रविवारी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची तर इतर 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या निर्णयामुळे राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्याची चर्चा आहे. अजित पवारांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण आहे. याचदरम्यान, अमोल मिटकरी यांनी मीडियाला प्रतिक्रिया दिली.
मिटकरी म्हणाले, आम्ही फुटीर नाही. आमचा पक्ष फुटलेला नाही. आम्ही एकसंघ आहोत. चुकीच्या गोष्टींना आम्ही विरोध केला. आताही करु. शरद पवारच आमचे गुरु, त्यांनी आम्हाला राजकीय ओळख दिली. शरद पवार हे भीष्मपीतामह आहेत. मी गुरुपोर्णिमेनिमित्त अजित पवारांची भेट घेतली. शरद पवारांनाही भेटणार आहे. सर्व पक्ष दादांसोबत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आहेत. आमच्या पक्षात इतर पक्षासारखी फूट नाही.








