आमच्या भूमीचा भारताविरोधात वापर होऊ देणार नाही : अर्थव्यवस्थेत लवकरच सुधारणा
वृत्तसंस्था /कोलंबो
आमच्या भूमीचा वापर कधीच भारताविरोधात होऊ देणार नाही. आम्ही चीनसोबत कधीच कुठल्याही प्रकारचा सैन्य करार करणार नसल्याचे श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी मंगळवारी स्पष्ट केले आहे. विक्रमसिंघे हे ब्रिटन अन् फ्रान्सच्या दौऱ्याकरता रवाना झाले आहेत. चीन आणि श्रीलंकेचे संबंध मजबूत आहेत, परंतु आमच्या देशात चीनचा कुठलाच सैन्यतळ नाही आणि भविष्यातही नसणार आहे. कुठलाही देश श्रीलंकेचा वापर भारताविरोधात करू शकणार नाही. आम्ह देशाच्या अर्थव्यवस्थेला लवकरच रुळावर आणू असे विक्रमसिंघे यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.
श्रीलंका तटस्थ देश
श्रीलंका हा एक तटस्थ देश असून आम्ही चीनसोबत कुठल्याही प्रकारचा सैन्य करार केलेला नाही. तसेच अशाप्रकारचा करार करण्याचीही आमची योजना नाही. आमच्या भूमीचा भारताविरोधात कधीच वापर होऊ दिला जाणार नाही. कुठलाही देश श्रीलंकेचा तळाप्रमाणे वापर करू शकणार नसल्याचे विक्रमसिंघे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले आहे.
हंबनटोटा बंदराची सुरक्षा
हंबनटोटा बंदर चीनला 99 वर्षांच्या भाडेकरारावर प्रदान करण्यात आले आहे. परंतु तेथील सुरक्षाव्यवस्था आमच्या सैन्याकडे आहे. याचमुळे या बंदराचा वापर केवळ व्यापारासाठी केला जाईल याची खात्री आम्ही करत आहोत. आमचा देश संकटाला सामोरा गेला असून आता स्थिती बरीच सुधारली आहे. भारतासमवेत अनेक देशांनी आम्हाला मदत केली आहे. श्रीलंकेची अर्थव्यवस्था लवकरच रुळावर परतेल अशी अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.
चीनची हेरगिरी नौका
मागील वर्षी चीनची स्पाय शिप युआन वांग-5 श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरावर पोहोचली होती. तेव्हा चिनी नौकेमुळे भारतीय नौदल आणि इस्रोची हेरगिरी होण्याचा धोका वाढला होता. परंतु तेव्हा भारताने देखील प्रत्युत्तरादाखल तयार केली होती. चीनची ही स्पाय शिप सुमारे 750 किलोमीटर अंतरावरून टेहळणी करू शकते. हंबनटोटा बंदरापासून कन्याकुमारीपर्यंतचे अंतर सुमारे 451 किलोमीटर इतके आहे. हेरगिरीचा धोका पाहता भारताने श्रीलंकेला या नौकेला हंबनटोटामध्ये प्रवेश न देण्याचे आवाहन केले होते.









