मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे मौन अनुष्ठान समारंभात प्रतिपादन
बेळगाव : धार्मिक आचरण, संस्कृती, परंपरा, गुरुभक्ती व साधुसंतांमुळे आमची भूमी पवित्र झाली आहे. अशा पवित्र भूमीत जीवन जगतो, हे आपले पुण्य आहे, असे महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. तारिहाळ येथील श्री आडवीसिद्धेश्वर मठात शनिवारी सायंकाळी झालेल्या तारिहाळ उत्सव-2025 मौन अनुष्ठान समारंभात बोलताना लक्ष्मी हेब्बाळकर पुढे म्हणाल्या, श्रावण मासानिमित्त लोककल्याणासाठी देवभूमी हिमालयात श्री आडवीसिश्वर स्वामीजींनी एक महिना मौन अनुष्ठान केले आहे. या पार्श्वभूमीवर सुवासिनींची ओटी भरण्याच्या कार्यक्रमात भाग घेणेही आपल्यासाठी सौभाग्यच आहे.
बेळगाव ग्रामीण मतदारसंघ, मठाधीश, शेकडो मंदिरे व सज्जनांमुळे पुण्यक्षेत्र बनले आहे. तुमच्या आशीर्वादामुळेच आपण मंत्री झाले आहे. राज्याची सेवा करतानाच बेळगाव ग्रामीण मतदारसंघाचा नावलौकिक वाढवण्याची संधी आपल्याला मिळाली आहे, असेही मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या. यावेळी श्री मनिप्र मुरुगेंद्र स्वामीजी, मुनवळ्ळी सोमशेखर मठाचे श्री मनिप्र प्रभू निलकंठ स्वामीजी, म्हैसूर येथील श्री निरंजनदेवरू, गुलबर्गा मेळकुंदा येथील शशिकुमार देवरू, श्री निरुपाधि देवरू, गुळेदगुड्ड येथील श्री रेवणसिद्धेश्वर देवरू, बैलवाड येथील श्री शंकरलिंग देवरू, गदग येथील वेदमूर्ती सदानंद शास्त्राr, सोमनाळचे शरणबसव हिरेमठ, पंचाक्षरी हुगार यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









