सावंतवाडी / प्रतिनिधी
अर्बन क्लिनिक आपला दवाखाना असा नवा फॉर्म्युला महाराष्ट्र राज्य सरकारने हाती घेतला आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात शहरी भागात असे आपले दवाखाने सुरू करण्यात येत आहेत. सावंतवाडी शहरात दोन ठिकाणी आपले दवाखाने सुरू होणार आहेत. त्यामुळे सावंतवाडीकर नागरिकांना शहरात आरोग्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. सावंतवाडी नगरपालिकेच्या माध्यमातून एक दवाखाना सुरूच आहे. आता शासनाच्या या दोन दवाखान्यांच्या वाढीव संख्येमुळे सावंतवाडी शहरात तीन दवाखाने होणार आहेत. अर्बन क्लिनिक आपला दवाखान्यामध्ये डायबीटिस, बीपी , आदी आजारांची तपासणी व त्यावर उपचार केले जाणार आहेत. शहरात सालईवाडा येथील मुख्याधिकारी निवासस्थानच्या जागेत तर जिमखाना मैदान लाखेवस्ती अशा दोन ठिकाणी हे आपले दवाखाने असणार आहेत. विशेष म्हणजे गेली 15 ते 20 वर्ष सावंतवाडी सालईवाडा मिलाग्रीस हायस्कूल जवळील पालिकेच्या अखत्यारित मुख्याधिकारी निवासस्थान इमारत पूर्णपणे बंद होती. या इमारतीच्या जागेत आता तब्बल वीस वर्षानंतर ही इमारत पुन्हा नव्या जोमाने आपला दवाखाना म्हणून पाहायला मिळणार आहे.









