चंद्राबाबू नायडू यांचे वक्तव्य
वृत्तसंस्था/ विजयवाडा
आंधप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी राज्य सरकारकडून विजयवाडा येथे आयोजित इफ्तार सोहळ्यात बोलताना वफ्फ संपत्तींच्या सुरक्षेसाठी स्वत:च्या प्रतिबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. तेलगू देसम पत्र नेहमीच अल्पसंख्याकांचे कल्याण आणि त्यांच्या अधिकारांच्या रक्षणासाठी समर्पित राहिला आहे. आमचे सरकार नेहमीच वक्फ संपत्तींचे रक्षण करत आले आह आणि यापुढेही करणार असल्याचे नायडू यांनी म्हटले आहे.
आमच्या सरकारने 2025-26 च्या अर्थसंकल्पात अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी 5300 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तेदेप सरकारने मुस्लीम समुदायासोबत न्याय केला आहे आणि रालोआ शासनात त्यांची स्थिती आणखी सुधारणार आहे. तेदेप सरकारने नेहमीच मुस्लीम समुदायाच्या कल्याणाला प्राथमिकता दिली असल्याचा दावा नायडू यांनी केला आहे.
आंध्रप्रदेश सरकारकडून आयोजित या इफ्तार पार्टीवर काही मुस्लीम संघटनांनी बहिष्कार टाकला होता. या संघटना वक्फ सुधारणा विधेयकावरून नाराज आहेत. या संघटनांनी हे विधेयक मागे घेण्याची मागणी केली आहे. नायडू यांचा पक्ष रालोआत सामील आहे, रालोआ सरकारने वक्फ सुधारणा विधेयक संसदेत मांडले आहे.









