सार्वजनिक बांधकाम खात्याने तात्काळ दखल घेण्याची वाहनचालकांची मागणी
ओटवणे प्रतिनिधी
सावंतवाडी – ओटवणे या मुख्यमार्गादरम्यान मे महिन्यात बांधण्यात आलेल्या दोन्ही मोऱ्यावरील रस्त्याचा पृष्ठभाग पहिल्याच पावसात खचला आहेत. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या खचलेल्या भागात वाहने आदळून वाहन चालकांसह वाहनानांही याचा फटका बसत आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असुन सार्वजनिक बांधकाम खात्याने याची तात्काळ दखल घेऊन त्वरीत कार्यवाही करावी अशी मागणी वाहन चालकांमधुन होत आहे.
सावंतवाडी – ओटवणे – असनिये ते पुढे दोडामार्ग तालुक्यात जाणाऱ्या या मुख्य रस्त्याच्या नुतनिकरणासाठी यावर्षी सुमारे दोन कोटी रुपये खर्च करण्यात आले. याच कामाचा अंतर्गत ओटवणे मांडवफातरवाडीत दोन मोऱ्या बांधण्यात आल्या. परंतु या मोरीवरील रस्त्याचा पृष्ठभाग पहिल्या पावसापासुनच खचायला सुरुवात झाली. या दोन्ही मोऱ्यांच्या दरम्यानचा तसेच पलीकडचा रस्ता वाहतुकीस सुरळीत असल्यामुळे वेगाने येणारी वाहने या खचलेल्या भागाला आदळतात.
या दोन्ही मोऱ्यावरील रस्त्याच्या खचलेल्या पृष्ठभागाला वाहने जोरदार आढळून वाहनांचे नुकसान होतेच शिवाय वाहन चालकांचे अक्षरशः कंबरडे मोडते. तसेच या खचलेल्या पृष्ठभागामुळे अपघाताचीही शक्यता आहे. त्यामुळे निकृष्ट दर्जाच्या या कामाबाबत वाहन चालकांमधे तीव्र नाराजी आहे. पर्यायाने संबंधित खात्याने याची तात्काळ दखल घ्यावी आणि हा रस्ता वाहतुकीस सुरळीत करावा अशी मागणी होत आहे.









