फेरीबोट तिकिट दरवाढीविरोधात काँग्रेसचा इशारा
पणजी : फेरीबोट प्रवासाच्या तिकिटदरात वाढ करून राज्यातील भाजप सरकारने सर्वसामान्य जनतेला लुटण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. फेरीबोटीतून प्रवास करणाऱ्या दुचाकींसाठी तिकिट आकारण्याची सरकारने काढलेली अधिसूचना त्वरित मागे घ्यावी, अन्यथा नदी परिवहन खात्यावर धडक मोर्चा काढला जाईल, असा इशारा काल रविवारी काँग्रेस नेत्यांनी दिला. जुने गोवे येथील फेरीबोट धक्क्याजवळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा, हळदोणेचे आमदार अॅड. कार्लुस फेरेरा, अमरनाथ पणजीकर, कुंभारजुवे काँग्रेस गटाचे विशाल कळंगुटकर व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी सरकारच्या फेरीबोट तिकिटदरवाढीविरोधात जोरदार निदर्शने करीत सरकारविऊद्ध घोषणा दिल्या. अमित पाटकर म्हणाले, सरकार कोट्यावधी ऊपयांचे इव्हेंट आयोजित करते. परंतु गोव्याच्या प्रमुख प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या नावाखाली कोट्यावधी ऊपयांची उधळण करण्यात येत आहे. परंतु सर्वसामान्यांसाठी आवश्यक असलेली फेरीबोटसेवा न परवडण्यासारखी करुन जनतेवर बोजा टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. सरकारने सर्वसामान्यांच्या भावनांशी खेळ चालवला आहे, असेही ते म्हणाले.









