वीज पुरवठा खंडित करताना ग्राहकांना विश्वासात घ्यावे ; अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकू- संतोष नानचे
दोडामार्ग – वार्ताहर
ऐन नवरात्रोत्सवात व दोडामार्गच्या आज रविवारच्या आठवडा बाजार दिनी तालुका महावितरणने मेंटेनन्सच्या नावाखाली संपूर्ण शहर परिसराचा वीज पुरवठा खंडित करून मनमानी कारभार केला आहे. शिवाय सध्या कडक उन्हामुळे प्रचंड गर्मीने नागरिक त्रस्त झाले असून अशी मेंटेनन्सची कामे सोमवारी करणे योग्य होते. त्यामुळे उगाचच नागरिकांना त्रास देण्याच्या हेतूने दोडामार्ग महावितरणने हे काम सुरू केले आहे. त्यामुळे अशी कामे करताना नागरिकांना व ग्राहकांना विश्वासात घेऊन कामे करावे अन्यथा भाजपच्यावतीने धडक मोर्चा काढत कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल असा इशारा दोडामार्गचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष नानचे यांनी दिला आहे.
श्री. नानचे पुढे म्हणाले की, आज रविवारी दोडामार्ग शहराचा आठवडा बाजार असतो. बाजारदिनी अनेक ठिकाणाहून नागरिक येत असतात. शिवाय सर्वत्र सध्या नवरात्रोत्सवाचे अनेक उपक्रम सुरू आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्या कारणाने अनेक व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानात थंड पेय, आईसक्रीम, लस्सी असे अनेक खाद्यपेय व पदार्थ यांनी शितकपाटे भरून ठेवली आहेत. मात्र बराच वेळ वीज खंडित असल्याने हेही पदार्थ खराब होतात. आज आठवडा बाजार आहे शिवाय नवरात्रोत्सवही सध्या सुरू आहे त्यामुळे महावितरणने आपल्या सासोली येथील सबस्टेशन मध्ये आजच का मेंटेनन्सचे काम करायला घेतले. याआधी वेळ मिळाला नाही का ? नाहीतर नवरात्रोत्सवा नंतर काम करायला घ्यायला हवे होते. मात्र असे न करता मनमानी कारभार करत नागरिकांना व ग्राहकांना त्रास होईल या हेतूने ते आजच करायला घेतले. त्यामुळे महावितरणने अशी कामे करताना शहरातली व्यापाऱ्यांना व ग्राहकांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. यापुढे ही महावितरणने असेच जर मनमानी काम सुरू ठेवले तर त्यांच्या कार्यालयावर भाजपच्या वतीने मोर्चा काढत कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल असा सज्जड इशाराही श्री. नानचे यांनी यावेळी दिला आहे.









