पुणे / प्रतिनिधी :
करदात्यांनी ईडीला वगैरे घाबरण्याची गरज नाही. ठाम आणि स्पष्टपणे व्यवस्थेच्या विरुद्ध बोलायला शिकले पाहिजे. तरच सामान्य माणसाला न्याय मिळेल. नाहीतर आपल्या देशाचीदेखील अवस्था श्रीलंकेसारखी व्हायला वेळ लागणार नाही. देशातील बडय़ा उद्योजकांनी 10 लाख कोटी रुपयांची कर्जे घेतली, पण त्याबद्दल अवाक्षर काढले जात नाही. परंतु शेतकऱ्यांची 70 हजार कोटी कर्ज माफ केली, तर सगळीकडे बोंबाबोंब होते. ही खेडय़ातील काम करणाऱ्या शेतकऱ्याची व्यथा असल्याची खंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शुक्रवारी व्यक्त केली.
अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे म्हसोबा उत्सवाचे आयोजन मंडईतील बुरूड आळी येथे करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने भूषण पुरस्कार प्रदान सोहळा गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडला. यावेळी एअरमार्शल (निवृत्त) भूषण गोखले, कोहिनूर उद्योग समूहाचे चेअरमन कृष्णकुमार गोयल, पू. ना. गाडगीळ आणि कंपनीचे सौरभ गाडगीळ, संगीतकार सलील कुलकर्णी, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव, ॲड. विजयराज दरेकर आदी उपस्थित होते.
शेट्टी म्हणाले, शेतकरी का आत्महत्या करतो. तो दारिद्रयात आणि पिचलेला का राहतो, कारण तो कोणाचेही शोषण करत नाही. घाम गाळून शेतकरी नवनिर्मिती करतो. त्याला नैसर्गिक आपत्तीलादेखील सामोरे जावे लागते. बेरोजगारांना रोजगार देण्याचे काम शेतीने केले. रोजगार निर्मिती शेतकरी करतो. शेतकरी आणि शेती उद्योग हे देशाचे सामर्थ्य आहे, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. सामान्य माणूस वेगवेगळय़ा प्रकारचे कर भरून हैराण झाला आहे. याच्यावर अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. कर नावाचा भस्मासुर राज्यकर्त्यांनी आपल्यावर लादला आहे. या भस्मासुराला कितीही खायला दिले, तरी त्याचे पोट भरत नाही. आपल्या देशाचे जीएसटीचे उत्पन्न 1 लाख 68 हजार कोटी आहे, तरीसुद्धा ते पैसे शासनाला कमीच पडतात, असेही त्यांनी या वेळी नमूद केले.
हेही वाचा : MPSC कडून मुख्य परीक्षेचे वेळापत्रक जाहीर