पुणे / प्रतिनिधी :
जनतेची कामे करायला तुम्हाला पदे दिली आहेत. त्यामुळे पदासाठी कुणीही भांडत बसू नये. अन्यथा, एकेकाच्या कानाखाली काढेन, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सोमवारी पक्ष कार्यकर्त्यांना सज्जड दम दिला.
आठ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. या वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, सुनील तटकरे, विलास लांडे, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर ते बोलत होते.
पवार म्हणाले, जनतेची कामे करण्यासाठी पदे दिली आहेत. पदासाठी भांडायचे नाही. यातून तुमची नव्हे; पवार साहेबांची बदनामी होते. हा कोणता फाजिलपणा सुरू आहे? असे कराल, तर पदाचा राजीनामा घेऊ. टोकाचा निर्णय घेण्यास मागेपुढे पाहणार नाही. राष्ट्रवादीचे पदाधिकारी म्हणून लोक तुमच्याकडे बघत असतात, याचे भान ठेवा.
पवारांनी मुनगंटीवारांना सुनावले
भाजपचे नेते मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला असल्याकडे लक्ष वेढले असता त्याला प्रत्त्युत्तर देताना पवार म्हणाले, आपण त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार आहोत? संस्कार झाले असतील, त्यानुसार ते बोलणार. पण वास्तविक सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून ती अपेक्षा नव्हती, अशी भूमिका मांडत पवार यांनी सुधीर मुनगंटीवार यांना सुनावले.