उच्च न्यायालयाचा ममता बॅनर्जी सरकारला निर्देश
वृत्तसंस्था/ कोलकाता
रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रांदरम्यान पश्चिम बंगालच्या काही जिल्हय़ांमध्ये सांप्रदायिक हिंसा झाली होती. या हिंसेप्रकरणी कलकत्ता उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. या हिंसेप्रकरणी उच्च न्यायालयाने ममता बॅनर्जी सरकारला चांगलेच फटकारत कायदा-सुव्यवस्था राखण्याचे निर्देश दिले आहेत. हनुमान जयंतीदरम्यान काढण्यात येणाऱया मिरवणुकांदरम्यान कायदा-सुव्यवस्था बिघडणार नाही हे सुनिश्चित करा. कायदा-सुव्यवस्था सांभाळण्यास राज्य सरकार अक्षम असल्यास निमलष्करी दल तैनात करा असा निर्देश उच्च न्यायालयाने ममता बॅनर्जींच्या सरकारला दिला आहे.
ज्या भागांमध्ये कलम 144 लागू आहे, तेथून कुठल्याही स्थितीत मिरवणूक निघू नये असेही उच्च न्यायालयाने बजावले आहे. मागील आठवडय़ात रामनवमीनिमित्त आयोजित शोभायात्रांदरम्यान पश्चिम बंगालच्या हुगळी आणि हावडा जिल्हय़ांमध्ये हिंसा झाली होती.
रामनवमीदरम्यान झालेल्या हिंसेनंतर ममता बॅनर्जी यांच्या सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या हिंसेप्रकरणी उच्च न्यायालयाने ममता बॅनर्जी सरकारकडून अहवाल मागविला होता. बंगाल पोलिसांना स्थिती सांभाळता येत नसल्यास मिरवणूक निघणाऱया भागांमध्ये निमलष्करी दल तैनात करण्यात यावे असे उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बजावले आहे. तसेच शांतता प्रस्थापित करण्यासाठी कोणती पावले उचलली याची माहिती देण्याचा निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे.









