पुणे / वार्ताहर :
उत्तरप्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल सारख्या राज्यातून येऊन गणेशोत्सवात गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरणाऱ्या 4 जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. हडपसर पोलिसांनी ही कारवाई केली.
कौशल मुन्ना रावत (वय 21, बंगाला बाजार, लखनौ, उत्तरप्रदेश), मंतोषसिंग श्रवण सिंह (22), जोगेश्वर कुमार रतन महतो उर्फ नोनिया (30), सुरज रामलाल महतो (30, तिघेही रा. बाबूपूर, जि. साईगंज, झारखंड) असे अटक करण्यात आलेल्या मोबाईल चोरांचे नाव आहे. तर ताब्यात घेण्यात आलेला अल्पवयीन मुलगा पश्चिम बंगाल येथील आहे.
पोलीस अंमलदार प्रशांत टोणपे, अजित मदने यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती होती की, मोबाईल चोरणारे संशयित हे गांधी चौक येथे थांबले आहेत. हडपसर पोलिसांनी सापळा रचून आरोपांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 3 लाख 80 हजारांचे 20 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या गुन्हाच पुढील तपास पोलीस नाईक अंकुश बनसुडे हे करत आहेत.
चोरीच्या मोबाईलची लखनऊच्या बाजारात विक्री
पुण्यातील गणेशोत्सवात गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरण्यासाठी हे पाचही आरोपी 15 सप्टेंबर रोजी लखनऊ स्थानकावर एकत्र भेटले. त्यानंतर हे आरोपी 20 सप्टेंबर रोजी पुण्यात आले. त्यानंतर त्यांनी हडपसर, बंडगार्डन, स्वारगेट फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल चोरले. आरोपी हे चोरीचे मोबाईल लखनऊ येथील चोर बाजारात विक्री करत होते.