दोन नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द झाल्याने मनपा कौन्सिल विभागाकडून तत्परता
बेळगाव : महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या ऐन तोंडावरच भाजपच्या दोन नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द झाल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. यापूर्वी 22 जानेवारी रोजी महापालिकेच्या कौन्सिल विभागाकडून निवडणुकीसंदर्भात प्रादेशिक आयुक्तांना अहवाल पाठविण्यात आला होता. मात्र, आता भाजपच्या दोन नगरसेवकांना निलंबित करण्यात आल्याने दोन सदस्यांना वगळत सध्याच्या उपलब्ध पात्र मतदारांची माहिती कौन्सिल विभागाकडून पुन्हा प्रादेशिक आयुक्तांना मंगळवार दि. 11 रोजी पाठविण्यात येणार असल्याचे कौन्सिल विभागातून सांगण्यात आले. विद्यमान महापौर सविता कांबळे आणि उपमहापौर आनंद चव्हाण यांचा कार्यकाळ तीन दिवसांनंतर म्हणजे 14 फेब्रुवारी रोजी संपणार आहे. त्यामुळे निवडणूक घेण्यासंदर्भात महानगरपालिकेच्या कौन्सिल विभागाकडून 22 जानेवारी रोजी सध्याचे आरक्षण त्याचबरोबर मतदारांची संख्या व अन्य माहिती प्रादेशिक आयुक्तांना एका अहवालाद्वारे कळविण्यात आली होती.
त्यामुळे प्रादेशिक आयुक्तांलयाकडून लवकरच निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यातच गोवावेस येथील खाऊ कट्ट्यात पत्नींच्या नावे गाळे घेतल्याप्रकरणी नगरसेवक जयंत जाधव आणि नगरसेवक मंगेश पवार यांना अपात्र ठरवत प्रादेशिक आयुक्त एस. बी. शेट्टण्णावर यांनी निलंबित केले आहे. त्यामुळे मंगळवारी महानगरपालिकेच्या कौन्सिल विभागाकडून सध्या पात्र असलेल्या मतदारांची माहिती प्रांताधिकारी कार्यालयाला कळविली जाणार आहे. याबाबत आवश्यक माहिती मंगळवारी सायंकाळपर्यंत प्रांताधिकारी कार्यालयाला पाठविण्यात येणार असल्याचे कौन्सिल विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. जुन्या माहितीनुसार निवडणूक घोषित झाल्यास त्याला स्थगिती मिळण्याची शक्मयता आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्यावतीने आवश्यक माहिती तातडीने पाठविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या मनपात 58 नगरसेवक आहेत. त्यापैकी दोन नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याने सध्या 56 नगरसेवक, महापौर-उपमहापौर निवडणुकीत मतदान करण्यास पात्र असणार आहेत. तर 2 खासदार, 4 आमदार आणि एक विधानपरिषद सदस्य असे एकूण 63 मतदार या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र असणार आहेत.









