गॉफ, स्वायटेक, मर्टन्स, पेगुला पराभूत
वृत्तसंस्था/ स्टुटगार्ट
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरु असलेल्या स्टुटगार्ट खुल्या पोर्श्च ग्रा प्री महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत लॅटव्हियाच्या जेलेना ओस्टापेंकोने पोलंडच्या स्वायटेकचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेत साबालेंकाने शेवटच्या 4 खेळाडूत स्थान मिळविले आहे.
क्लेकोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ओस्टापेंकोने आपल्या दर्जेदार खेळाच्या जोरावर पोलंडच्या द्वितीय मानांकित इगा स्वायटेकचा 6-3, 3-6, 6-2 अशा सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या 4 खेळाडूत स्थान मिळविले. 2017 साली ओस्टापेंकोने फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकली होती. हार्डकोर्टवरील स्पर्धेमध्ये ओस्टापेंकोने यापूर्वी 4 वेळेला स्वायटेकला पराभूत केले आहे. आता ओस्टापेंको आणि इक्टेरीना अॅलेक्सेंड्रोव्हा यांच्यात उपांत्य फेरीची लढत होईल. अॅलेक्सेंड्रोव्हाने तृतीय मानांकित जेसिका पेगुलाचे आव्हान 6-0, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये संपुष्टात आणत उपांत्य फेरी गाठली. अन्य एका सामन्यात टॉप सिडेड साबालेंकाने इलेसी मर्टन्सचा 6-4, 6-1 असा पराभव करत शेवटच्या 4 खेळाडूत स्थान मिळविले. साबालेंका आणि पाओलिनी यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होईल. सहाव्या मानांकित पाओलिनीने अमेरिकेच्या चौथ्या मानांकित कोको गॉफचे आव्हान 6-4, 6-3 असे संपुष्टात आणत उपांत्य फेरी गाठली आहे.









