महिला दुहेरीत सानियाचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त
वृत्तसंस्था/ अबुधाबी
डब्ल्यूटीए टूरवरील 2023 च्या टेनिस हंगामातील येथे सुरू झालेल्या अबुधाबी 500 दर्जाच्या खुल्या आंतरराष्ट्रीय महिला टेनिस स्पर्धेत एकेरीत जेलेना ओस्टापेंको आणि मार्टा कोस्टय़ूक यांनी विजयी सलामी दिली. तर महिला दुहेरीत सानिया मिर्झा आणि तिची साथीदार बेथेनी सँडस् यांचे आव्हान पहिल्या फेरीत समाप्त झाले. सानिया मिर्झा 27 फेब्रुवारीपासून होणाऱया दुबई टेनिस स्पर्धेनंतर व्यवसायिक टेनिस क्षेत्रातून आपली निवृत्ती जाहीर करणार आहे.
महिला एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात पाचव्या मानांकित ओस्टापेंकोने डॅनिली कॉलिन्सचा 7-5, 1-6, 7-5 अशा सेटस्मध्ये पराभव करत दुसऱया फेरीत प्रवेश मिळवला. हा सामना सव्वादोन तास चालला होता. कॉलिन्सने यापूर्वी झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. महिला एकेरीच्या अन्य एका सामन्यात मार्टा कोस्टय़ूकने सोरेना सिरेस्टीवर 6-2, 1-6, 6-2 अशी मात करत विजयी सलामी दिली.
महिला दुहेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात बेल्जियमच्या किर्स्टेन फ्लिपकिन्स आणि लॉरा सिगमंट यांनी भारताच्या सानिया मिर्झा आणि तिची अमेरिकन साथीदार बेथेनी सँडस् यांचा 6-3, 6-4 अशा सरळ सेटस्मध्ये पराभव करत दुसऱया फेरीत स्थान मिळवले. गेल्या महिन्यात झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा या भारतीय जोडीने मिश्र दुहेरीचे उपविजेतेपद मिळवले होते.









