वृत्तसंस्था /न्यूयॉर्क
जपानची 25 वर्षीय महिला टेनिसपटू तसेच चारवेळा ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवणारी नाओमी ओसाका 2024 च्या जानेवारी महिन्यात होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत आपले टेनिस क्षेत्रात पुनरागमन करणार आहे. गेल्या जुलै महिन्यात 25 वर्षीय ओसाकाने शाय या पहिल्या मुलीला जन्म दिला होता. त्यानंतर ती 2022 सप्टेंबरपर्यंत टेनिस क्षेत्रापासून अलिप्त होती. तिने आपली शेवटची स्पर्धा टोकियोतील पॅन पॅसिफिक खेळली होती. पुढील वर्षी होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेत आपण पुनरागमन करीत असल्याचे ओसाकाने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. अमेरिकेचा माजी जागतिक दर्जाचा जलतरणपटू मिचेल फ्लेप्सने नाओमी ओसाकाच्या टेनिस क्षेत्रातील पुनरागमनाबाबत कौतुक केले आहे. 2019 साली महिला टेनिसपटूंच्या मानांकन यादीत ओसाकाने अग्रस्थान पटकावले होते. तिने आतापर्यंत आपल्या वैयकितक टेनिस कारकीर्दीत 4 ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. 2019 आणि 2021 साली तिने ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम तर 2018 आणि 2020 साली तिने अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली होती.









