वृत्तसंस्था/ ऑकलंड
चारवेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणाऱ्या जपानच्या नाओमी ओसाकाने नव्या वर्षाची विजयी सुरुवात करताना येथे सुरू असलेल्या ऑकलंड टेनिस क्लासिक स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. तिने ज्युलिया ग्रॅबहरचा पराभव केला.
पावसाचा व्यत्यय व जोरदार वाऱ्याशी मुकाबला करीत ओसाकाने ज्युलियावर 7-5, 6-3 अशी मात केली. चेंडू उडवताना वाऱ्याचा त्रास होत असला तरी ओसाकाने आपली सर्व्हिस एकदाही ड्रॉप केली नाही आणि ज्युलियाची प्रत्येक सेटमध्ये एकेकदा सर्व्हिस भेदत सामना जिंकला. या स्पर्धेचा हा टप्पा गाठण्याची तिची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2017 मध्ये तिने इथवर मजल मारली होती. ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धा 12 जानेवारीपासून सुरू होत असून त्याच्या पूर्वतयारीची ही एक स्पर्धा आहे.









