विशेष प्रतिनिधी / पणजी
गुऊवारी शपथग्रहण झालेल्या दोन मंत्र्यांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे उद्या सोमवारी खातेवाटप करणार आहेत. अनेक मंत्र्यांच्या खात्यांमध्येही बदल होण्याची शक्यता आहे. मंत्री दिगंबर कामत आणि मंत्री रमेश तवडकर या दोघांचा शपथविधी गुऊवारी झाला आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना आपल्याकडील खाती बहाल करण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर सर्वच मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल हवा, अशी पक्षाकडून सूचना आलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील फेररचना करतात की, आपल्याकडील खाती या दोन मंत्र्यांना देऊन इतर मंत्र्यांची खाती जशीच्या तशी ठेवतात हे उद्या सोमवारी स्पष्ट होणार आहे.
मंत्र्यांना कोणती खाती द्यावयाची याचा निर्णय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे स्वत: घेणार आहेत, मात्र शुक्रवारी सायंकाळी त्यांनी प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केली. या चर्चेमध्ये काय निष्पन्न झाले हे कळण्यास मार्ग नाही. दिगंबर कामत हे ‘देवाचो मनीस’ म्हणून ओळखले जातात. शुक्रवारी सायंकाळी अमावस्या होती ती शनिवारपर्यंत चालू होती. त्यामुळे त्याऐवजी रविवारी खाती दिली तरी चालतील अशी सूचना त्यांनी केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सोमवारीच या दोन्ही मंत्र्यांना खाती देतील. प्राथमिक माहितीनुसार रमेश तवडकर यांना क्रीडा तसेच एसटी खाते शिवाय शिक्षण खाते देण्याची शक्यता आहे. तर दिगंबर कामत यांना सार्वजनिक बांधकाम खाते दिले जाणार आहे. कला व सांस्कृतिक खाते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे स्वत:जवळ ठेवतील. याशिवाय सुभाष फळदेसाई यांना एखादे वजनदार खाते दिले जाणार आहे.









