मनपाकडून ब्लॅक स्पॉट निर्मूलनासाठी मोहीम : कचरा समस्या दिवसेंदिवस गंभीर
बेळगाव : शहर व उपनगरांतील ब्लॅक स्पॉट निर्मूलनासाठी महापालिकेकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी फुलांची सजावट करण्यासह बाकडे, त्याचबरोबर रोपटी लावली जात आहेत. बुधवार दि. 17 रोजी नार्वेकर गल्लीतील ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणचा कचरा काढून शोभेची झाडे व तुळशी कट्टा ठेवण्यात आला आहे. शहरातील कचऱ्याची उचल व विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात कचरा समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शहर स्वच्छतेचा ठेका नवीन ठेकेदाराला देण्यात आला असला तरीही अपेक्षित सुधारणा झाली नसल्याच्या तक्रारी आहेत. घरोघरी घंटागाडीच्या माध्यमातून कचऱ्याची व्यवस्थित उचल होत नसल्यानेच नागरिक रस्त्याच्या कडेला जागा मिळेल तेथे कचरा टाकत आहेत. त्यामुळेच विविध ठिकाणी
ब्लॅक स्पॉट तयार होत आहेत. त्याचा नाहक त्रास स्थानिकांना सहन करावा लागत आहे. दुर्गंधी पसरण्यासह कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे ब्लॅक स्पॉट हटविण्यासाठी महापालिकेच्या पर्यावरण व आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. ज्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट आहेत, तेथील कचऱ्याची उचल करून औषध फवारणी केली जात आहेत. त्याचबरोबर शोभेची झाडे, तुळशी कट्टा, बाकडे घालण्यासह रोपटीही लावली जात आहेत. मात्र, काही दिवसांनंतर पुन्हा त्या ठिकाणी कचरा टाकला जात असल्याने महापालिकेची डोकेदुखी वाढत आहे. बुधवारी नार्वेकर गल्लीतील ब्लॅक स्पॉट ठिकाणच्या कचऱ्याची उचल करून मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी रोपटी लावली. तसेच यापुढे या ठिकाणी कचरा टाकण्यात येऊ नये, असे आवाहनही करण्यात आले.









