विविध कार्यक्रमांचे आयोजन
ओटवणे | प्रतिनिधी
माजगांव येथील माजगांव पंचक्रोशी मनविकास ग्रंथालय मंडळ या ग्रंथालयाचा सुवर्ण महोत्सवी वर्ष सांगता सोहळा आज शनिवारी सायंकाळी ३ वाजता ग्रंथालयाच्या सभागृहात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष राज्य ग्रंथ मित्र पुरस्कारप्राप्त अनंत उर्फ आनंद वैद्य, सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे, ज्येष्ठ लेखक तथा साहित्यिक प्रवीण बांदेकर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे सावंतवाडी अध्यक्ष दीपक पटेकर, माजगांव ग्रामपंचायत सरपंच रिचर्ड डिमेलो आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सन ३ सप्टेंबर १९७५ रोजी स्थापन झालेल्या माजगांव पंचक्रोशी मनविकास ग्रंथालय मंडळाने सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहे. गावातील ग्रंथालयाचा सुवर्ण महोत्सव हा माजगाववासियांसाठी सुवर्णक्षण असुन अभिमानाची बाब आहे. ग्रंथालयाच्या या सुवर्ण महोत्सवी वाटचालीत गावातील सर्व घटकांचे योगदान आहे. त्यामुळेच या ग्रंथालयाने आज सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे.कार्यक्रमाला या बैठकीला गावातील सर्व नागरीक, गुरुजन, विद्यार्थी तसेच संस्थेचे हितचिंतक, वाचक सदस्य यानी उपस्थित रहावे असे आवाहन माजगांव पंचक्रोशी मनविकास ग्रंथालय मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत, कार्यवाह सतिश मालसे, ग्रंथपाल सौ. मधू कुंभार यांनी केले आहे.









