अहमदाबादमध्ये करण्याचे प्रयत्न ?, सूत्रांकडून संकेत, अधिकाऱ्यांकडून इन्कार
वृत्तसंस्था/ गांधीनगर
गुजरात सरकारने 2036 च्या ऑलिम्पिक खेळांचे यजमानपद भूषविण्याचे लक्ष्य समोर ठेवून अहमदाबादमध्ये पायाभूत साधनसुविधा उभारण्यास सुऊवात केली आहे. अशा वेळी राज्य सरकार 2026 च्या राष्ट्रकुल खेळांचे यजमानपद भूषविण्यासाठी अहमदाबादच्या माध्यमातून बोली लावू शकते असे संकेत मिळाले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया प्रांताने मंगळवारी फुगलेल्या खर्चाचे कारण देत 2026 च्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजनातून अंग काढून घेतले आहे. या पार्श्वभूमीवर हे संकेत मिळाले आहेत.
गुजरात सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2030 च्या राष्ट्रकुल खेळांचे आयोजन अहमदाबादमध्ये करण्याच्या दृष्टीने बोली लावण्याची तयारी करण्यात आली होती आणि 2028 पर्यंत सर्व पायाभूत साधनसुविधांची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. परंतु आता ते 2026 च्या राष्ट्रकुल खेळांचे आयोजन करण्यासाठी बोली लावण्यावर सक्रियपणे विचार करत आहेत आणि केंद्र सरकार त्यास अनुकूल असेल अशी आशा त्यांनी बाळगलेली आहे.
दरम्यान, गुजरात सरकारच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी स्पष्ट केले की, 2026 च्या राष्ट्रकुल खेळांचे आयोजन अहमदाबादमध्ये करण्याच्या दृष्टीने पावले टाकण्याबाबत राज्याने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. यासंदर्भात प्रसिद्धीमाध्यमांत प्रसिद्ध झालेली वृत्ते त्यांनी फेटाळली आहेत. 2036 च्या ऑलिम्पिकचे यजमनापद मिळविणे हे त्यांचे लक्ष्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्य सरकार 2026 च्या राष्ट्रकुल खेळांच्या आयोजनाचे हक्क मिळवण्याचा विचार करत आहे का असे विचारले असता एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर बोलताना आपल्याला तशा कुठल्याही हालचालींची आतापर्यंत माहिती नसल्याचे स्पष्ट केले.









