लायन्स क्लब-महावीर लिंब सेंटरतर्फे लाभ घेण्याचे आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
लायन्स क्लब ऑफ बेळगाव व हुबळी येथील महावीर लिंब सेंटरच्या सहकार्याने कृत्रिम अवयव रोपण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर पूर्णत: मोफत असून गरजूंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन या उपक्रमाचे इव्हेंट चेअरपर्सन रवींद्र काकती यांनी पत्रकार परिषदेत केले. ते म्हणाले, लायन्स क्लबची स्थापना 1962 साली झाली. आजपर्यंत क्लबने शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आदी विकासाभिमुख उपक्रम राबविले व गरजूंना मदत केली. दर दोन वर्षांनी क्लब मोफत अवयव रोपण शिबिर आयोजित करते. गतवर्षी या शिबिराचा 73 जणांना लाभ झाला होता. यंदासुद्धा हे शिबिर घेण्यात येत आहे.
यावेळी क्लबचे माजी अध्यक्ष व प्रसिद्धी विभागप्रमुख प्रभाकर शहापूरकर म्हणाले, पूर्वीप्रमाणे या शिबिरासाठी येऊन अर्ज भरण्याची गरज नाही. यासाठी आम्ही एक व्हाट्सअॅप नंबर देत असून त्या क्रमांकावर इच्छुक किंवा गरजू आपला अर्ज भरू शकतात. अर्ज भरताना आधारकार्ड आवश्यक आहे. 9964247171 या क्रमांकावर संपर्क करून अर्ज मागवता येईल. 25 फेब्रुवारीपर्यंत व्हाट्सअॅपद्वारेच हा अर्ज भरून देणे आवश्यक आहे. क्लबच्या अध्यक्षा दया शहापूरकर म्हणाल्या, सदर अवयव रोपण करण्यापूर्वी क्लबतर्फे गरजूंना प्रशिक्षण दिले जाते. अवयव रोपण केल्यानंतर ती व्यक्ती पूर्वीप्रमाणेच सहज हालचाल करू शकते. इतकेच नव्हे तर ती वाहनसुद्धा चालवू शकते. महावीर लिंब सेंटर आता मानवी अवयव रोपणाबरोबरच एखाद्या गायीचा पाय निकामी झाला असेल तर तिच्यावरसुद्धा कृत्रिम अवयव रोपण करू शकते, असेही त्यांनी सांगितले. उपप्रांतपाल राजशेखर हिरेमठ यांनी अधिकाधिक गरजूंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. क्लबच्या सचिव गीता कित्तूर यांनी आभार मानले. याप्रसंगी जयश्री काकती, हेमंत कित्तूर व अन्य सदस्य उपस्थित होते.









