विविध प्रजातीच्या समुद्री माशांचे घडणार दर्शन
बेळगाव ; उन्हाळी सुटी सुरू झाल्याने बेळगावमध्ये मुले आणि प्रेक्षकांसाठी ‘अॅक्वा टनेल शो’ प्रथमच आयोजित करण्यात आला आहे. अत्यंत वेगळ्या पद्धतीचा हा शो असून समुद्री माशांच्या विविध प्रजाती यात पाहायला उपलब्ध करून दिल्या आहेत. सीपीएड मैदानावर लवकरच हा शो सुरू होत असून यामध्ये 1 हजारहून अधिक विविध प्रकारचे मासे पाहायला मिळतील. त्यामध्ये प्रामुख्याने एंजल फिश, स्कॉर्पियन फिश, समुद्री घोडा, रिल्स, बाकफिश यांचा समावेश आहे. समुद्राच्या पाण्यामध्ये जलचर जीव कसे सुरक्षित राहतात, याची माहिती या शोमध्ये मिळेल. गेल्या पाच वर्षांपासून हा शो आपण करत असून माशांना ऑक्सिजन पुरविला जातो. तसेच 24 तास विद्युत प्रवाह सुरू ठेवला जातो. आपल्याकडील सर्व स्टाफना आता माशांची काळजी कशी घ्यावी, याचे प्रशिक्षण मिळाले असल्याने मासे सुरक्षित आहेत. बेळगावमध्ये प्रथमच होणाऱ्या या प्रदर्शनाचा बेळगावकरांनी कुटुंबासह लाभ घ्यावा, असे आवाहन प्रदर्शनाचे प्रमुख सुनील राजन अगरवाल यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना केले.









