सैन्याचा उपक्रम : नागालँडमधून सुरू होणार रॅली
वृत्तसंस्था /लेह
कारगिल विजयाच्या 25 व्या वर्षानिमित्त सैन्याकडून हुतात्म्यांच्या स्मरणार्थ दुचाकीवरून ईशान्येतील राज्यांपासून लडाखमध्ये यात्रा आयोजित होणार आहे. ही यात्रा नागालँडची राजधानी कोहिमापासून सुरू होत केंद्रशासित प्रदेश लडाखच्या कारगिल युद्ध स्मारकापर्यंत पोहोचणार आहे. अभियान 3 ते 26 जुलैपर्यंत चालणार असून यादरम्यान दुचाकींवरून 3,700 किलोमीटरचे अंतर कापले जाणार आहे. 26 जुलै रोजी विजय दिनी कोहिमा येथून सुरू झालेल्या अभियानाला पूर्व कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ हिरवा झेंडा दाखविणार आहेत. या अभियानाचा उद्देश ईशान्येला लडाखशी जोडणे असल्याचे सांगण्यात आले. या यात्रेद्वारे लडाखच्या सीमेवर शूरपणे लढत सर्वोच्च बलिदान करणाऱ्या सैनिकांनाही श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. राष्ट्रनिर्मिती, युवांना प्रेरित करण्यासह माजी सैनिकांच्या तक्रारी दूर करण्यात सैन्याच्या भूमिकेवर प्रकाश टाकणाऱ्या समाजाच्या सर्व घटकांसोबत ही टीम चर्चा करणार आहे. कारगिल विजय दिवस दरवर्षी 26 जुलै रोजी साजरा करण्यात येतो. 1999 च्या कारगिल युद्धातील भारताचा विजयाचे स्मरण करण्यासाठी आणि हौतात्म्य पत्करलेल्या नायकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा दिन साजरा करण्यात येतो.









