प्रतिनिधी /पणजी
आंतरराष्ट्रीय पर्यटकांना गोव्याकडे आकर्षित करण्यासाठी पर्यटन खात्यातर्फे मार्च 2023 मध्ये 4 आंतरराष्ट्रीय ‘रोड शो’ चे आयोजन करण्यात आले असून त्यावर ऊ. 1.7 कोटी खर्च करण्यात येणार आहेत. युरोपियन देशामध्ये हे रोड शो होणार असून त्याची तयारी खात्याने सुऊ केल्याचे सांगण्यात आले.
मागील 3 वर्षात म्हणजे 2020, 2021 व 2022 मध्ये कोरोनाच्या महामारीमुळे गोव्यात अपेक्षेप्रमाणे जास्त प्रमाणात आंतरराष्ट्रीय पर्यटक आले नाहीत. त्यांची संख्या मर्यादीतच राहिली. त्यांची संख्या वाढावी म्हणून हे रोड शो आखण्यात आले असून 21 मार्च रोजी पॅरिस – फ्रान्स, 24 मार्च झुरीच – स्वित्झर्लंड, 27 मार्च फ्रँकफुर्ट – जर्मनी व 29 मार्च व्हिहेन्ना ऑस्ट्रीया असे ते रोड शो आयोजित करण्यात आले आहेत.
नुकत्याच संपलेल्या 2022 वर्षात आंतरराष्ट्रीय – राष्ट्रीय स्तरावरील रोड-शो, टॅव्हल मेळावा यावर ऊ 5.42 कोटी खर्च करण्यात आले. शिवाय 2017 ते 2020 या एकुण 4 वर्षात राज्य सरकारतर्फे अर्थात पर्यटन खात्याने रोड शो, प्रदर्शने व इतर पर्यटन वाढीसाठी ऊ. 33.68 कोटी खर्च केले. या खर्चाची पूर्व हिशोब तापसणी (प्री ऑडीट) करण्यात आले आहेत अशी माहिती प्राप्त झाली आहे. शिवाय पर्यटन अधिकारी यांच्यावर किती खर्च झाला याचा वेगळा हिशोब ठेवण्यात आलेला नसल्याचे सांगण्यात आले. यंदा पर्यटन खात्याने आंतरराष्ट्रीय पर्यटन वाढीवर जास्त लक्ष केंद्रीत केले असून राष्ट्रीय स्तरावरील पर्यटन समाधानकारक असल्याचे सूत्रांनी नमूद केले त्यामुळे त्यासाठी वेगळे काही करण्याची गरज नाही असे पर्यटन खात्याचे म्हणणे आहे.









