उद्योजक श्रीनिवास धेंपो यांची माहिती
प्रतिनिधी /पणजी
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गोवातर्फे विद्यार्थी निधी गोवा यांच्या सहकार्याने गोव्यात ‘स्टुडंट्स एक्सपिरियन्स इन इंटरस्टेट लिव्हिंग कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय एकात्मता यात्रा 2023चे आयोजन करण्यात आले आहे. पूर्वोत्तर राज्यातील विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ दि. 11 रोजी ते दि. 13 रोजी या दरम्यान गोव्याला भेट देणार आहेत. गोव्याची कला व संस्कृती पूर्वोत्तर राज्यातील विद्यार्थ्यांना कळावी यादृष्टीने सदर यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्वागत समितीचे अध्यक्ष उद्योजक श्रीनिवास धेंपो यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कोकण राज्य सहसचिव धनश्री मांद्रेकर, के.ब. हेडगेवार विद्यालयाचे मुख्याध्यापक व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कोकण विभागाचे उपाध्यक्ष विलास सतरकर, स्वागत समितीचे ऍड. प्रविण फळदेसाई उपस्थित होते.
सिल प्रतिनिधींचे दि. 11 रोजी मडगाव रेल्वे स्थानकावर आगमन होईल. सर्व विद्यार्थी प्रतिनिधींचे अभाविप गोव्याच्या कार्यकर्त्यांकडून भव्य स्वागत केले जाईल. त्यानंतर के.ब. हेडगेवार विद्यालय कुजिरा येथे त्यांच्यासाठी ओरियंटेशन शिबिर होईल. या शिबिरानंतर प्रतिनिधी त्यांच्या यजमान कुटुंबाकडे जातील. यजमान कुटुंबे ही गोव्यातील स्थानिक घरे असून गोव्यातील घरे आणि कौटुंबिक जीवनशैली अनुभवण्यासाठी राहतील. दुसऱया दिवशी दि. 12 रोजी सर्व प्रतिनिधींना गोवा दर्शन दौऱयासाठी नेण्यात येईल. या दौऱयात गोव्याची संस्कृती आणि प्रसिद्ध स्मारके, मंदिरे, चर्च, समुद्रकिनारे दाखविण्यात येतील. विद्यार्थ्यांना श्री महालसा नारायणी मंदिर वेर्णा, कामाक्षी मंदिर शिरोडा, ओल्ड गोवा चर्च, मिरामार समुद्रकिनारा याठिकाणी भ्रमंती करण्यात येणार. त्यानंतर मांडवी रिव्हर क्रूझ याठिकाणीही नेण्यात येणार. तिसऱया दिवशी दि. 13 रोजी विद्यार्थी प्रतिनिधी गोव्यातील विविध महाविद्यालयांना भेट देतील. ते तेथील प्रयोगशाळा, ग्रंथालय, प्राध्यापक कक्ष आणि कॅम्पसमधील प्रमुख ठिकाणांना भेट देतील. यामुळे महाविद्यालयांचे प्राचार्य, व्यवस्थापन, वरिष्ठ शिक्षक व्यवस्था समजून घेण्यात मदत होईल. त्याचदिवशी सायंकाळी प्रतिनिधींसोबत राज्यपाल पी. श्रीधरन पिल्लई दरबार हॉल राजभवन येथे चहापानांसह संवाद साधतील. त्यानंतर अभाविप गोवातर्फे प्रतिनिधी आणि गोव्यातील नामवंत व्यक्तीसोबत संवादासाठी मिरामार येथील गास्पर डायस येथे स्वागत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व प्रो. डॉ. अल्लम प्रभू विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दि. 14 रोजी ते रवाना होतील. पूर्वोत्तर भागातील 8 राज्यातील 30 विद्यार्थी गोव्यात येणार असून 15 कुटुंबात ते राहतील अशी माहिती धेंपो यांनी यावेळी दिली.
सिल हा प्रकल्प 1966मध्ये सुरू करण्यात आला होता. पूर्वोत्तर भारताला देशात एकजूट करून ठेवण्याकरिता सिलतर्फे राष्ट्रीय एकात्मता दौरे आणि सांस्कृतिक विनिमय कार्यक्रम नियमितपणे आयोजित केला. या प्रकल्पाने गेल्या काही वर्षात पूर्वोत्तर राज्यांमधील भारतविरोधी चळवळींना आव्हान देऊन त्यावर मात केली आहे. 1966पासून फक्त कोविड काळातील दोन वर्षे सोडल्यास हा प्रकल्प अखंडितपणे सुरू आहे असे विलास सतरकर यांनी यावेळी सांगितले.









