२० व २१ डिसेंबर रोजी १५ वे संमेलन
दोडामार्ग – प्रतिनिधी
धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईच्या वतीने पिकुळे येथे श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय मध्ये येत्या २० व २१ डिसेंबर रोजी १५ वे ‘ नवा विद्यार्थी ‘ कुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.बुधवारी २० डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वा. शोभायात्रे अंतर्गत ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे. तर गुरुवार २१ डिसेंबर रोजी या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप हे उद्घाटक असून विशेष अतिथी म्हणून राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर तर संमेलनाध्यक्ष म्हणून वारणा महाविद्यालय जि. सांगली येथील हिंदी विभागप्रमुख तथा जेष्ठ साहित्यिक डॉ. सूरज चौगुले हे असणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर हे आहेत. शिवाय प्रमुख अतिथी म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जी. प. चे शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) प्रदीपकुमार कुडाळकर, शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) सुभाष चौगुले, पोलीस निरीक्षक अरुण पवार, उद्योजक विवेकानंद नाईक, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील, गटशिक्षणाधिकारी निसार नदाफ, आदी उपस्थित राहणार आहेत.पिकुळे सरपंच आपा गवस, झारेबांबर सरपंच अनिल शेटकर, शालेय समिती सदस्य सावळाराम उर्फ बबन गवस, पिकूळे ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबई सचिव प्रमोद गवस, जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश गवस, पिकूळेचे माजी सरपंच रामचंद्र गवस, बांदा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मकरंद तोरसकर, माजी कार्यकारी संपादक ,नवा विद्यार्थी कैलास जाधव आदी उपस्थित राहतील .
पंधरावे नवा विद्यार्थीचे कुमार साहित्य संमेलन.
बुधवारी ग्रंथ दिंडी तथा शोभायात्रा व गुरुवारी सकाळी ८.३० ते ११ वां. च्या वेळेत उद्घाटन कार्यक्रम झाल्यानंतर ११ ते १ वा. वेळेमध्ये कथाकथन व कथा लेखन तंत्र हा विशेष कार्यक्रम होणार आहे. यामध्ये डॉ. अनिल फराकटे ( स्तंभलेखक व समीक्षक ) तसेच निलेश पवार आकाशवाणी निवेदक व कथाकार हे मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी २.३० ते सायंकाळी ४ वा. च्या वेळेत सावंतवाडी मधील ज्येष्ठ मालवणी कवी दादा मडकईकर यांचा विशेष कार्यक्रम संपन्न होणार असून कमलेश गोसावी, युवराज सावंत, सरिता पवार, कल्पना मलये हे सहभागी होणार आहेत. शिवाय सायंकाळी ४ ते ५ या वेळेत समारोप संपन्न होणार असून संमेलनाध्यक्ष डॉ. सूरज चौगुले हे आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. या संपूर्ण संमेलन कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पिकुळे प्रशालेच्या मुख्याध्यापिका स्नेहल गवस यांनी केले आहे.