क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
बीसीसीआयच्या आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेप्रमाणे यावर्षीच्या सप्टेंबर – ऑक्टोबर महिन्यात इंडियन वॅटरन्स प्रीमियर लीग (आयव्हीपीएल) क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. जयपूरात झालेल्या बोर्ड ऑफ वॅटरन्स क्रिकेट ईन इंडियाच्या राष्ट्रीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
यावेळी मध्य विभागाचे प्रवीण त्यागी, गोव्याचे विनोद फडके, पश्चिम विभागाचे मयांक खांडवाला, संयुक्त सचिव सेनन नायर, सुनील कुलकर्णी, उत्तरप्रदेश वॅटरन्स क्रिकेट संघटनचे अध्यक्ष रवींद्र त्यागी तसेच राजस्थानचे नलीन जैन आदी उपस्थित होते.
देहरादूनात इंडियन वॅटरन्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन होणार असून यासाठी सहा उद्योग समुहाने प्रँचाईससाठी उत्सूकता दाखवली आहे. प्रत्येक संघात दोन विदेशी खेळाडू, दोन क्रिकेटपटू कसोटी क्रिकेट खेळलेले अनिवार्य असतील. त्यापूर्वी बोर्ड ऑफ वॅटरन्स क्रिकेट ईन इंडिया अखिल भारतीय पातळीवरील डबल विकेट क्रिकेट स्पर्धा आयोजित करणार असल्याची माहिती यावेळी उपाध्यक्ष विनोद फडके यांनी दिली. ही स्पर्धा गाजियाबाद येथील नेहरु नगर स्टेडियमवर होईल.
बोर्ड ऑफ वॅटरन्स क्रिकेट ईन इंडियाची पुढील कार्यकारी मंडळाची बैठक 28 जानेवारी रोजी मुंबईत अध्यक्ष तथा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत होणार असून यावेळी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येतील. जयपूरमध्ये झालेली कार्यकारी मंडळाची बैठक अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या अनुपस्थितीत उपाध्यक्ष प्रवीण त्यागी यांच्या अध्यक्षतेखाली झाली.









