बेळगाव : कोणतेही संकट निर्माण झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी व नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी बेळगाव आणि चिकोडी येथे बचावात्मक प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्याची सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी अधिकाऱ्यांना दिली. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बुधवारी झालेल्या आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या बैठकीत ते बोलत होते. संकटाचा सामना कसा करावयाचा, याची माहिती देताना ते म्हणाले, आगीची दुर्घटना घडल्यानंतर बचावात्मक प्रात्यक्षिक करण्यापूर्वी आवश्यक ती पूर्व तयारी करण्यात यावी. तत्पूर्वी आंतरिक सुरक्षेची पाहणी करावी. पोलीस, अग्निशमन दल, परिवहन खाते, आरोग्य खाते यांच्या समन्वयाने प्रात्यक्षिके करावीत. आगीची दुर्घटना घडल्यानंतर त्यामधून कसे सावरावे यासाठी अग्निशमन दलाकडून प्रात्यक्षिके दाखविली जावी, असेही ते म्हणाले.
चिकोडी हद्दीतील कणगला, बेळगाव शहर व परिसरात प्रात्यक्षिके करावीत. त्याची जबाबदारी तहसीलदारांना द्यावी, आवश्यक असणाऱ्या साधनसामुग्री उपलब्ध करावी, लाल पिवळा, हिरवा आणि काळा असे चार विभाग तयार करावेत. आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांची यासाठी मदत घ्यावी. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे, अशी सूचनाही जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केली. या बैठकीस जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरली, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख आर. बी. बसरगी, मनपा आयुक्त शुभा बी., पशुसंगोपन खात्याचे उपसंचालक डॉ. राजीव कुलेर, जिल्हा नगर विकास योजना संचालक मल्लिकार्जुन कलादगी, तालुका तहसीलदार व अन्य खात्याचे अधिकारी उपस्थित होते.









