श्री.प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस बचाव व संवर्धन कृती समितीचे चेअरमन के.जी.पाटील यांना निवेदन
कोल्हापूर प्रतिनिधी
श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग या संस्थेत मनमानी कारभार सुरु असल्याचा आरोप करत याबाबत श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस बचाव व संवर्धन कृती समितीने मंगळवारी चेअरमन के. जी. पाटील यांना प्रश्नावली सादर केली. या प्रश्नावलीतील प्रश्नांचे दहा दिवसात स्पष्टीकरण द्यावे. तसेच समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास संस्थेसमोर गांधीगिरी पध्दतीने आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींग हाऊस बचाव व संवर्धन कृती समितीने चेअमन पाटील यांना निवेदनाद्वारे दिला.
निवेदनात म्हटले आहे, संस्थेचा कारभार मनमानीपणे सुरु आहे. गेल्या 4 वर्षात वार्षिक सभा घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. संस्थेच्या कार्यकारिणीतील रिक्त पदे भरली नाहीत. संस्थेचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. विद्यार्थी वसतीगृहे बंद पडणे, विना कोटेशन आर्थिक व्यवहार करणे, संस्थेच्या खर्चाने स्वत:चा वाढदिवस साजरा करणे, स्कूल कमिट्यांच्या सभा नियमानुसार न येणे, बेकायदेशीर नेमणूका करणे, न्यू पॉलिटेक्निकच्या प्राचार्यांचा मनमानी कारभार सुरू आहे.
न्यू कॉलेज प्राध्यापक भरती, कॉलेज ऑफ आर्किटेक्चरची ढासळलेली गुणवत्ता, संस्थेस 103 वर्षे झाली तरीही शतक महोत्सव सांगता समारंभ न घेणे, संस्थेच्या सेवकामध्ये असलेला असंतोष आदी प्रश्नांबाबत श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस बचाव व संवर्धन कृती समितीने संस्थेचे चेअरमन के. जी. पाटील यांना प्रश्नावली सादर केली. याबाबत दहा दिवसात स्पष्टीकरण द्यावे. समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास गांधीगिरी पद्धतीने संस्थेसमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कृती समितीने दिला.
यावेळी कृती समितीचे पंडीत पोवार, जगन्नाय सूर्यवंशी, प्रा. अशोक शिरगांवकर, विजय साळोखे, सुधाकर सरनाईक, संजय देशिंगे, दिलीप सरनाईक, मारुतराव सोनाळकर, यशवंत शिंदे, शफीक देसाई, अजित मांगलेकर, राजेंद्र इंगवले, केशव माने, चंद्रकांत सुर्यवंशी, संजय पडवळे, कमलाकर पाटील, सुरेश जाधव, उत्तम तिबीले, आनंदराव चौगले, दिपक साळोखे, किरण सरनाईक, मनोहर लाड, रवि किशोर माने, अनिल भोईटे, अनिल चव्हाण आदी उपस्थित होते.









