बेळगावात 21 नोव्हें. ते 23 डिसें.पर्यंत कार्यक्रम : 22 डिसेंबर रोजी मुलांसाठी श्लोक पठण स्पर्धा
बेळगाव : व्यक्तिमत्त्व विकास, नैतिकतेचे आचरण, सामाजिक सलोखा व राष्ट्रीय एकात्मता या उद्दिष्टांसाठी गेल्या सतरा वर्षांपासून भगवद्गीता अभियान चालविले जात आहे, अशी माहिती सोंदा स्वर्णवल्ली महासंस्थानचे जगद्गुरु शंकराचार्य श्री गंगाधरेंद्र सरस्वती स्वामीजींनी दिली. 21 नोव्हेंबर ते 23 डिसेंबरपर्यंत बेळगावात राज्य पातळीवरील भगवद्गीता अभियान होणार आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी गुरुदेव रानडे मंदिरात पूर्वतयारी बैठक झाली. या बैठकीत बोलताना स्वामीजींनी वरील माहिती दिली. वैज्ञानिकदृष्ट्या आपण पुढारत आहोत. मात्र, मानसिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मानसिक ताणतणावांमुळे अनेक रोग उद्भवत आहेत. मधुमेह, अतिरक्तदाब, हृदयाघाताचे रुग्ण वाढत आहेत. या सर्व विकारांवर भगवद्गीतेत उपाय आहेत. लोकांची मनस्थिती बरी नसेल तर काही करूनही उपयोग नाही, असे स्वामीजींनी सांगितले. गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. एखाद्या गुन्हेगारी घटनेनंतर काय करावे, यापेक्षा गुन्हेच घडू नयेत, यासाठी प्रयत्न करण्याचा हेतू भगवद्गीता अभियानामागे आहे. गुन्हेगारीच्या मुळावरच घाव घालण्याचा या अभियानाचा उद्देश आहे.
द्वेश व आशा हेच या अपराधांमागील मूळ कारण आहे. या मुळावरच घाव घालण्यास भगवद्गीता साहाय्यभूत ठरते. धर्म, पंथांमध्ये एकतेचा संदेश पोहोचविणे हा याचा उद्देश आहे. गीता सर्वांना एकत्र आणते. मुलांना वाईट मार्गाला लागण्यापासून रोखते, असेही स्वामीजींनी सांगितले. 21 नोव्हेंबर रोजी अभियानाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर 21 डिसेंबरपर्यंत राज्यभर भगवद्गीता पठण, प्रवचन आदी कार्यक्रम होणार आहेत. 2 डिसेंबर रोजी बेळगाव येथे भगवद्गीता व कायदा या विषयावर कार्यक्रम होणार आहे. 11 डिसेंबर रोजी गीता समन्वय हा कार्यक्रम होणार आहे. 22 डिसेंबर रोजी शाळकरी मुलांसाठी भगवद्गीता श्लोक पठण स्पर्धा आयोजित केली आहे. 23 डिसेंबर रोजी अभियानाचा समारोप होणार आहे, असेही स्वामीजींनी सांगितले. यावेळी गुरुदेव रानडे मंदिराचे एम. बी. जिरली, माजी आमदार अनिल बेनके, विधान परिषदेचे माजी सदस्य महांतेश कवटगीमठ, अभियानाचे कार्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, एम. के. हेगडे, सुब्रमण्य भट, पूर्णिमा हेगडे, रामनाथ नायक, गणेश हेगडे, कृष्ण भट, विनायक हेगडे, सुधा हेगडे, वसुमती हेगडे आदी उपस्थित होते.









