थेट शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी खाते करणार मार्गदर्शन : येत्या हंगामात क्षेत्र वाढीवर भर
बेळगाव ; रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे जमिनीचा पोत कमी होऊन पडीक जमिनीचे क्षेत्र वाढू लागले आहे. यासाठी आता कृषी खात्याने पुढाकार घेतला आहे. जमिनीचा पोत टिकून राहावा, यासाठी कृषी खाते शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे धडे देणार आहे. येत्या खरीप हंगामात जास्तीत जास्त क्षेत्र सेंद्रिय शेतीच्या लागवडीखाली आणण्यासाठी खात्याचे प्रयत्न सुरू आहेत. कृषी खाते रयत संपर्क केंद्रामार्फत शेतकऱ्यांना थेट शेतीच्या बांधावर जाऊन सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. रासायनिक खते, कीटकनाशके आणि इतर रासायनिक खतांचा वापर टाळण्यासाठी कृषी खात्याने हा निर्णय घेतला आहे. अलीकडे रासायनिक खतांचा वापर वाढल्याने जमिनीतील पोत कमी होऊन अन्नातील सकसपणा कमी होऊ लागला आहे. रासायनिक खतांचा वापर केलेले अन्न खाण्यास धोकादायक ठरू लागले आहे. दरम्यान नागरिकांना आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय खातांच्या मागे पडावे, असे आवाहनदेखील कृषी खात्याने केले आहे. कृषी खाते सेंद्रिय आणि जैविक खतांचा वापर करण्याबाबत जनजागृती करणार आहे. विविध भागात शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीची प्रात्यक्षिके दाखवून माहिती देणार आहे. याबरोबरच किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी खात्याचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. वाढत्या रासायनिक खतांमुळे जमिनीची सुपिकता कमी होऊन दर्जाहीन उत्पादन होऊ लागले आहे. दरम्यान कीटकनाशकांचादेखील वापर वाढल्याने अशा अन्नातून मानवाला धोका निर्माण होऊ लागला आहे. यासाठी सेंद्रिय शेती काळाची गरज बनली आहे. या दृष्टिकोनातून कृषी खाते शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे धडे देण्यासाठी तयार झाले आहे.









