सोशल मीडियासह अन्य माध्यमातून प्रसिद्धी देण्याचे काम भरभरून सुरू, मात्र…
By : नंदू कुलकर्णी
हातकणंगले : सध्या देशातील अनेक शेतकरी देशी गाईंचे संगोपन, गोप्रसार व प्रचारासह सेंद्रिय शेतीचे महत्व व भारतीय परंपरा जपण्याचे मोलाचे कार्य करीत आहेत. त्याला सोशल मीडियासह अन्य माध्यमातून प्रसिद्धी देण्याचे काम भरभरून सुरू आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी देशी गायींचे पालन–पोषण व त्याच माध्यमातून सेंद्रिय शेती करीत आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला योग्य भाव मिळत नसल्याने गोपालक शेतकरी अडचणीत आला आहेत. तरीही हातकणंगले तालुक्यातील आळते गावातील गोपालक व सेंद्रिय शेती करणारे शेतकरी निव्वळ शेतीचा पोत सुधारतो.
निरोगी आरोग्य लाभते व देशी गाईंची पैदास होत असल्याच्या आशेवर गोपालन व सेंद्रिय शेती करीत आहेत. 2015 साली 13 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन श्री. श्री. किसान सेंद्रिय उत्पादक मंच या नावाने आळते (ता. हातकणंगले) येथे गटशेती सुरू केली.
गट शेतीचा मुख्य उद्देश देशी गायींचे पालनपोषण करणे, बिघडलेल्या शेतीचा पोत व दर्जा सुधारणे, गायीचे गोमूत्र व शेणापासून रसायनमुक्त शेती करणेत, शेतीला लागणारी खते जीवामृत, घन जीवामृत, पंचगव्य व औषध बनविणे, तसेच गाईच्या दुधापासून तूप, दही, ताकासह उपपदार्थ बनवणे हा होता.
त्यासाठी गावातच तीन दिवसाचे शिबिर घेऊन शेतकऱ्यांचे प्रबोधन केले होते. मंचच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुरुवातीला हरियाणा राज्यातून गीर, सेहवाल, खिलार, काँकंरेल व राठी जातीच्या गायी आणण्यात आल्या. सध्या सर्वेनुसार गावात 183 देशी गायी आहेत.
गायीचे गोमूत्र व शेणाच्या खतातून सेंद्रिय ऊस, हळद व कडधान्य अशी पिके घेतली जातात. सेंद्रिय ऊसापासून सेंद्रिय गुळ व काकवी तयार केली जाते. सुरुवातीला सेंद्रिय शेतीतून भाजीपाला केला जायचा. पण हवामानाचा दुष्पपरिणाम व भाजीपाल्याला योग्य भाव मिळत नसल्याने नंतर भाजीपाला शेती बंद करण्यात आली.
त्यामुळे सेंद्रिय शेतीतून फारसा आर्थिक लाभ मिळाला नाही. मात्र शेतकऱ्यांनी देशी गाईची पैदास होते. गावातील लोकांचे आरोग्य निरोगी राहते व शेतकऱ्यांच्या शेतीच्या जमिनीचा पोत सुधारतोय. या उदात्त हेतूने गटशेती व देशी गाईचा दूध व्यवसाय सुरू ठेवला आहे. सध्या गटशेतीमध्ये 60 शेतकरी सक्रिय असून दररोज जवळपास सव्वाशे लिटर दूध विक्रीसाठी इचलकरंजी व कोल्हापूरला जाते.
सेंद्रिय शेती व गो पैदाससाठी सबसिडी द्यावी
राज्य शासनाने पावसाळी अधिवेशनात पशुपालनास कृषीप्रमाणे सवलत मिळणार असे नुकतेच जाहीर केले आहे. मात्र निवडणुकीपूर्वी देशी गाईला गोमाता–राष्ट्रमाता आहे असे जाहीर करून दररोज 50 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. मात्र निवडणुकीनंतर ही घोषणा घोषणाच ठरली. तशी अवस्था राज्य शासनाने जाहीर केलेल्या पशुपालनास कृषीप्रमाणे सवलत देऊ, अशी होवू नये. तसेच सेंद्रिय शेती व गोपैदाससाठी सबसिडी देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
चर्चा करणारे सेंद्रिय फळभाज्या, भाजीपाला, दूध घेत नाहीत
सेंद्रिय शेतीचे व देशी गाईंचे महत्त्व सर्वच जण नेहमी पटवून सांगत असतात. त्याचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. देशी गायीच्या दुधामुळे आरोग्य निरोगी राहते. तसेच गोमूत्र व शेणामुळे सेंद्रिय खत उत्तम औषधी असते.
त्यामुळे शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही, अशी चर्चा चवीने करतात. प्रत्यक्षात मात्र चर्चा करणारे व अन्य लोक सेंद्रिय फळभाज्या, भाजीपाला व दूध विकत घेत नाहीत. हे शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे. – अमोल रावसाहेब चौगुले, अभ्यासक, देशी गाय व सेंद्रिय शेती








