पुणे / वार्ताहर :
बिबट्याची शिकार करून त्याचे अवयव मांडवी बुद्रुक येथील फार्महाऊसमध्ये लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वन विभागाने छापा टाकून बिबट्याच्या नखांसह पंजा जप्त केला असून, वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये पुण्यातील दोन बड्या उद्योजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विश्वजीत विनायकराव जाधव आणि अभिजित विनायकराव जाधव (दोघे रा. डेक्कन जिमखाना ,पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या उद्योजकांची नावे आहेत. दोन्ही आरोपी पसार झाले असून, पोलिसांच्या मदतीने त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
खडकवासला धरण परिसरातील मांडवी खुर्द गावातील शेट्टी फार्म हाऊसमध्ये बिबट्याची शिकार करुन अवयव लपवून ठेवले असल्याची माहिती वन विभागाला मिळाली. त्यानंतर उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहायक वनसंरक्षक दीपक पवार, भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ, डोणजे वनपरिमंडळ अधिकारी सचिन सपकाळ आणि पथकाने रविवारी फार्महाऊसवर छापा टाकला. त्यावेळी तेथील एका कपाटात बिबट्याच्या नखांसह पंजा सापडला. याप्रकरणी डेक्कन पोलीस अधिक तपास करत आहेत.