दोन अंध व्यक्तींना मिळाली दृष्टी
प्रतिनिधी / बेळगाव
अपघातात जखमी झाल्याने मेंदू निष्क्रिय झालेल्या पंतबाळेकुंद्री येथील एका रहिवाशाने केलेल्या अवयवदानामुळे तिघांना जीवदान मिळाले आहे. हृदय, डोळे व मूत्रपिंड दान करण्यात आले आहे.
पंतबाळेकुंद्री येथील चिदानंद यचराप्पा पत्तार (वय 57) हे 5 नोव्हेंबर रोजी रात्री मोटारसायकल अपघातात जखमी झाले होते. त्यांच्या डोक्मयाला जबर दुखापत झाली होती.
त्यांना केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळात दाखल करण्यात आले होते.
चिदानंद हे सांबरा येथील हवाई दलात सिव्हिलियन म्हणून सेवा बजावत होते. त्यांचा मेंदू निष्क्रिय झाला. मात्र इतर अवयव सुस्थितीत होते. पत्नी व मुलांशी डॉक्टरांनी केलेल्या चर्चेनंतर अवयवदानाचा निर्णय घेण्यात आला. त्यांचे हृदय डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळात दाखल झालेल्या रुग्णाला दान करण्यात आले. दोन्ही मूत्रपिंडे धारवाड येथील एसडीएम इस्पितळाला पाठविण्यात आली. दोन अंधांना डोळे दान करण्यात आले.
अवयवदानामुळे इतरांच्या जीवनात प्रकाश पडतो. वेगवेगळय़ा आजारांमुळे त्रस्त असलेल्यांचे जगणे सुकर होते. ही गोष्ट चिदानंद यांच्या पत्नी व मुलांना पटवून देण्यात आली. बेळगाव व हुबळी-धारवाड पोलिसांनी मूत्रपिंड नेण्यासाठी निर्धोक वाहतुकीची सोय करून दिली. अवयवदानाचा निर्णय घेतलेल्या कुटुंबीयांचे माजी खासदार डॉ. प्रभाकर कोरे, इस्पितळाचे वैद्यकीय संचालक कर्नल डॉ. एम. दयानंद व डॉ. एम. व्ही. जाली यांनी अभिनंदन केले आहे.