केंद्रीय आरोग्यमंत्री मांडवियांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी शनिवारी दिल्लीत व्हर्च्युअल पद्धतीने ‘स्वस्थ सबल भारत’ परिषदेचे उद्घाटन केले आहे. यावेळी बोलताना मांडविया यांनी देशात अवयवदानाला चालना देण्यासाठी लोकांची भागीदारी आवश्यक असल्याचे उद्गार काढले आहेत.
सद्यस्थिती पाहता अवयवदान, नेत्रदान यासारख्या मुद्दय़ांवर चर्चा व्हावी. तसेच नजीकच्या भविष्यात उद्भवणाऱया समस्यांवर उपाय शोधले जावेत. आमच्या संस्कृती आणि परंपरेत आम्ही स्वतःबद्दलच नव्हे तर इतरांबद्दल देखील विचार करण्याची पद्धत आहे. अवयवदानाचा मुद्दा देखील आमच्या परंपरेशी जोडला गेलेला असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
अवयवदानासाठी लोकांना जागरुक करण्यात यावे. हे केवळ सरकार आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नांनी घडणार नाही. तर याकरता एका जनआंदोलनाद्वारे लोकांना जागरुक करण्यासाठी मोहीम राबविली जावी. आरोग्य मंत्रालय याकरता पूर्णपणे प्रतिबद्ध आहे. अवयवदानाशी निगडित मोहीम लोकांच्या सहभागाशिवाय यशस्वी होणार नसल्याचे ते म्हणाले.









