वैद्यकीय संचालक कर्नल डॉ. एम. दयानंद यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ बेळगाव
जगभरात गेल्या अनेक वर्षांपासून अवयव रोपणाची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळेच त्या देशांमध्ये अवयव दानासाठी लोकांनी आधीच निर्णय घेतलेले असतात. आपल्याकडे परिस्थिती याविरुद्ध आहे. अवयव दानामुळे अनेकांचा जीव वाचू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने अवयव दानाचा संकल्प करावा, असे आवाहन केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळ व वैद्यकीय संशोधन केंद्राचे वैद्यकीय संचालक कर्नल डॉ. एम. दयानंद यांनी केले.
अवयव दान दिनाच्या पार्श्वभूमीवर इस्पितळात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन करून ते पुढे म्हणाले, यापूर्वी केवळ मूत्रपिंड, हृदय, यकृत व नेत्ररोपण शस्त्रक्रिया केली जात होती. आता हातांचेही रोपण केले जात आहे. जास्तीत जास्त अवयव रोपण शस्त्रक्रिया करणाऱ्यात केएलई इस्पितळ राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
अवयव दान व रोपण शस्त्रक्रियेत काही कायदेशीर अडचणी असून त्या दूर करण्यासंबंधी डॉ. आर. बी. नेर्ली यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. संतोष पाटील, डॉ. स्नेहा चिकोडी, डॉ. अभिषेक पाटील, जनसंपर्क अधिकारी रुद्रगौडा पाटील, सुबोधकांत दरगशेट्टी, अनिल थरतारे, अवयव दान करणारे हणमंतप्पा सारवी, रुद्राप्पा कुमोजी, मुकुंद रतन यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. डॉ. बसवराज बिज्जरगी, डॉ. अरिफ मालदार, डॉ. सुदर्शन चौगला उपस्थित होते. काव्या पात्रोट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. राजशेखर सोमनट्टी यांनी आभार मानले.









