अरविंद केजरीवाल यांचा निर्धार : केंद्राच्या अध्यादेशाविरोधात दिल्लीत मेगा रॅली
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्राच्या अध्यादेशाविरोधात रविवारी रामलीला मैदानावर आम आदमी पक्षाची मेगा रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीच्या माध्यमातून आम आदमी पक्षाने केंद्राच्या अध्यादेशाविरोधात आपला रोष व्यक्त केला. अरविंद केजरीवाल आणि भागवत मान यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बलही या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकशाही वाचविण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असून हुकूमशाही संपवायला हवी, असे वक्तव्य केले.
आम आदमी पक्षाने लोकशाही वाचवण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. त्याच अनुषंगाने केंद्र सरकारने आणलेला अध्यादेश रद्द करायला लावल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा केजरीवाल यांनी रविवारी दिला. पंतप्रधानांमध्ये इतका अहंकार आहे की ते सर्वोच्च न्यायालयालाही मानत नाहीत. त्यांच्या या वृत्तीला हुकूमशाही किंवा हिटलरशाहीच म्हणायला हवे असे सांगत पंतप्रधानांनी देशाची घटना बदलल्याचा आरोपही त्यांनी केला. केंद्र सरकारने दिल्लीतील लोकांचे अधिकार काढून घेण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय नाकारला. या निर्णयाचे स्पष्टीकरण देण्यासाठी आम्ही कपिल सिब्बल यांना आमंत्रित केले आहे. येथे उपस्थित राहिल्याबद्दल मी कपिल सिब्बल यांचे मनापासून आभार मानतो, असेही ते पुढे म्हणाले. दिल्ली पोलिसांनी रॅलीच्या ठिकाणी आणि परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली होती.
पंतप्रधानांवर हल्लाबोल
भाजपचे लोक रोज माझा अपमान करतात. मला शिवीगाळ करतात. पण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. देशातील सर्व जनता तुमच्यासोबत आहे. मात्र, आम्ही दिल्लीच्या जनतेसोबत आहोत, असेही केजरीवाल यांनी उपस्थितांना संबोधित करताना स्पष्ट केले. पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना चौथी पास राजा देश कसा चालवणार हे समजत नाही, असा हल्लाबोलही त्यांनी केला. पंतप्रधानांनी दिल्लीतील जनतेच्या मताचा अपमान केला आहे. संपूर्ण देश दिल्लीकरांच्या पाठीशी आहे. 140 कोटी लोक मिळून संविधान वाचवतील. दिल्लीत जशी हुकूमशाही लागू झाली, तशीच उद्या पश्चिम बंगाल आणि राजस्थानातही आणली जाऊ शकते. सगळीकडे बेरोजगारी पसरली आहे. जीएसटीमुळे व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली आहे. महागाईने कहर केला असून दूध, दही, भाजीपाला, गॅसचे दर प्रचंड भडकलेले आहेत, असेही ते पुढे म्हणाले.
हुकूमशाही संपवण्यासाठी पुन्हा एकत्र
यापूर्वी आम्ही 12 वर्षांपूर्वी रामलीला मैदानावर जमलो होतो. आता हुकूमशाही संपवण्यासाठी पुन्हा एकत्र आलो आहोत. यापूर्वी भ्रष्टाचाराविऊद्धचा लढा या व्यासपीठावरून लढला गेला. आजपासून हुकूमशाहीविऊद्ध लढा सुरू करत असून हा लढा जिंकणारच, असा आशावादही केजरीवाल यांनी व्यक्त केला.
राज्यसभेत विधेयक रोखणार : संजय सिंह
केंद्र सरकार अध्यादेशाद्वारे जनतेचे हक्क हिरावून घेऊ इच्छित आहे. त्यामुळे केंद्र सरकारने मांडलेले विधेयक राज्यसभेत मंजूर होऊ देणार नाही, असे खासदार संजय सिंह म्हणाले. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही केंद्र सरकारच्या भूमिकेबाबत अनेक मुद्दे उपस्थित केले.
पंतप्रधानांची वागणूक स्वमर्जीने : सिब्बल
पंतप्रधानांवर हल्लाबोल करताना कपिल सिब्बल म्हणाले की, दिल्लीत विधानसभा असणे म्हणजे दिल्लीतील जनतेच्या मतानुसार सरकार चालवायचे आहे, पण मोदीजींना सर्व काही स्वत:च्या मर्जीनुसार चालवायचे आहे. केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करू शकत नाही. सर्वोच्च न्यायालय हा अध्यादेश रद्द करेल. सर्व काही केंद्र सरकार करत असेल तर विधानसभेला काय अर्थ आहे, असे ते पुढे म्हणाले. सर्व सत्ता आपल्या हातात असावी असा विचार करणे योग्य नाही. न्यायालय वगळता इतर सर्व संस्था केंद्राच्या अखत्यारीत आहेत. पंतप्रधान सर्व विरोधी पक्षांना संपवण्यात गुंतले आहेत, जर विरोधी पक्ष एक झाले नाहीत तर ते विरोधकांना संपवतील, असा दावाही सिब्बल यांनी केला.









