अर्थ खात्याची संमती, निवड यादी लवकरच जाहीर
बेळगाव : राज्यभरात प्राथमिक आरोग्य केंद्र, समुदाय आरोग्य केंद्रांमध्ये रिक्त असलेल्या डॉक्टरांच्या जागांवर कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्याला जिल्हाधिकाऱ्यांना आदेश बजावला असल्याचे आरोग्य खात्याने म्हटले आहे. राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, समुदाय आरोग्य केंद्रामध्ये रिक्त असलेल्या 250 एमबीबीएस डॉक्टर व 337 तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आरोग्य खात्याने एका आदेशाद्वारे अधिकार दिला आहे. 120 तज्ञ व 100 एमबीबीएस डॉक्टरांच्या नेमणुकीसाठी अर्थ खात्यानेही संमती दिली आहे. याशिवाय 9871 निम्नवैद्यकीय जागांवर कायम नेमणुकीसाठी प्रस्ताव सादर करण्यास अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आली असल्याचे आरोग्य खात्याने म्हटले आहे. तज्ञ डॉक्टर नसलेल्या वैद्यकीय केंद्रावर खासगी डॉक्टरांना केस बेसिसवर वैद्यकीय सेवा करण्यास अनुमती देण्यात येणार आहे. याशिवाय कंत्राटी पद्धतीने रिक्त असलेल्या 400 फॉर्मसी अधिकारी, 200 प्रयोगशाळा तांत्रिक यांच्याही नेमणुकीसाठी आदेश बजावण्यात आला आहे. आरोग्य खात्यामध्ये रिक्त असलेल्या 878 निम्नवैद्यकीय जागांवर नेमणुकीसाठी अधिसूचना देण्यात आली आहे. तात्पूर्ती निवड यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, असे आरोग्य खात्याने म्हटले आहे.









