वार्ताहर/ कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक येथून बेळगावला महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांना केएलई हॉस्पिटल मार्गे व शाहूनगर मार्गे बसेसमधून प्रवास करण्यास अनुमती मिळावी, अशा आशयाचे निवेदन विद्यार्थ्यांतर्फे ग्रा. पं. अध्यक्ष पूनम पाटील व उपाध्यक्ष यल्लोजी पाटील यांना देण्यात आले. तर ग्रामपंचायतीतर्फे राज्य परिवहन खात्याचे अधिकारी लमाणी यांनाही निवेदन देण्यात आले.
राज्य परिवहन मंडळाने कंग्राळी बुद्रुक गावाला केएलई हॉस्पिटल व शाहूनगर मार्गे प्रवासी व शालेय विद्यार्थ्यांची बसची चांगली सोय केली आहे. परंतु शालेय विद्यार्थ्यांना केएलई हॉस्पिटलमार्गे धावणाऱया बसमधूनच प्रवास करण्यास वाहक अनुमती देत होते. शाहूनगरमार्गे एखाद्या विद्यार्थ्यांने प्रवास केल्यास वाहक त्याच्याकडून तिकिटाचे पैसे घेत होते. यामुळे पास असूनही अनेक विद्यार्थ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता.
एकूण बस बेळगावलाच येणार ना!
शालेय विद्यार्थ्यांनी ग्रा. पं. ला निवेदन दिल्यानंतर लागलीच ग्रा. पं. ने राज्य परिवहन मंडळाचे अधिकारी लमाणी यांना दोन्ही मार्गे धावणाऱया बसमध्ये पासधारक विद्यार्थ्यांना अनुमती मिळावी अशा आशयाचे निवेदन दिले. यावेळी अधिकारी लमाणी म्हणाले, केएलई व शाहूनगर मार्गे धावणाऱया दोन्हीही बसेस बेळगावलाच येणार ना असे सांगून, त्या दोन्ही बसमध्ये विद्यार्थ्यांना पास चालवावा असा आदेश जारी केला. यामुळे ग्रामपंचायत, शालेय विद्यार्थी व पालकवर्ग यांच्यातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
निवेदन देतेवेळी ग्रा. पं. अध्यक्षा पूनम पाटील, उपाध्यक्ष यल्लोजी पाटील, सदस्य जयराम पाटील, नवनाथ पुजारी, तानाजी पाटील, युवा नेते मयुर बसरीकट्टी, प्रशांत पवार यांसह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.









