ग्राहक न्यायालयाचा निकाल : पाच महिन्यांत मिळाला कुटुंबीयांना दिलासा
प्रतिनिधी/ बेळगाव
बांधकाम कामगाराचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र कुटुंबीयांनी नुकसानभरपाईचा विनंती अर्ज करण्यास वेळ केला. त्यामुळे बांधकाम कामगार कार्यालयाने नुकसानभरपाई देता येणार नाही, असे सांगितले. त्याविरोधात ग्राहक न्यायालयात धाव घेतली असता ग्राहक न्यायालयाने मृत्यू झालेल्या बांधकाम कामगाराच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये 10 टक्के व्याजासह देण्याचे आदेश दिले आहेत. याचबरोबर बांधकाम कामगार विभागाला 8 हजारांचा दंडही ठोठावला आहे. यामुळे बांधकाम कामगारांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला.
परशराम यल्लाप्पा कणवी (रा. गजमिनाळ, ता. बैलहोंगल) यांचा 30 डिसेंबर 2020 रोजी अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूला एक वर्ष उलटल्यानंतर परशरामच्या कुटुंबीयांनी नुकसानभरपाई द्यावी, यासाठी कामगार कार्यालयाकडे अर्ज केला. मात्र ‘तुमच्याकडून अर्ज करण्यास चार दिवस उशीर झाला’, असे सांगून कुटुंबीयांचा अर्ज बांधकाम कामगार कार्यालयाने फेटाळला होता. त्यामुळे परशराम यांची पत्नी नागव्वा आणि कुटुंबीयांनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली.
ग्राहक न्यायालयाने त्यांची बाजू ऐकून घेऊन बांधकाम कामगाराच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये 10 टक्के व्याजासह देण्याचा आदेश बेळगाव साहाय्यक आयुक्त आणि बेंगळूरच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे त्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला. केवळ पाच महिन्यांत न्यायालयाने हा निकाल दिला आहे. फिर्यादीच्यावतीने अॅड. एन. आर. लातूर यांनी काम पाहिले. बांधकाम कामगारांचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळते. मात्र बरेचजण याकडे दुर्लक्ष करत असतात. केवळ कर्नाटकच नाही तर महाराष्ट्र, गोवा या राज्यातीलही बांधकाम कामगारांना दाद मागता येते. तेव्हा त्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी पुढे येणे गरजेचे असल्याचे अॅड. एन. आर. लातूर यांनी सांगितले.
कामगार कार्यालयाकडून
मिळते नुकसानभरपाई अपघात झाल्यानंतर बांधकाम कामगार केवळ विमा कंपनीच्याविरोधात न्यायालयात दावा दाखल करतात. मात्र बांधकाम कामगारांना कामगार कार्यालयाकडून स्वतंत्र नुकसानभरपाईची रक्कम मिळते. त्यासाठी अर्ज करणे महत्त्वाचे आहे. दुर्दैवाने एखाद्या बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला. त्याची सर्व कागदपत्रे असतील तर ग्राहक न्यायालयात धाव घेतल्यानंतर निश्चित नुकसानभरपाई मिळू शकते. तेव्हा बांधकाम कामगारांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी याची दखल घेणे गरजेचे असल्याचे अॅड. एन. आर. लातूर यांनी सांगितले.









