पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचा निर्णय : खासगी जागेतून बांधकाम केल्याने आक्षेप
बेळगाव : आनंदनगर, दुसरा क्रॉस, वडगाव येथील नाल्याचे बांधकाम खासगी जागेतून केले जात असल्याने स्थानिकांनी विरोध दर्शविला होता. त्यामुळे पालकमंत्री सतीश जारकीहोळींनी नाल्याचे काम तात्काळ थांबविले होते. नाला बांधकामप्रकरणी शुक्रवारी आनंदनगर रहिवाशांनी जारकीहोळींची पुन्हा भेट घेतली. त्यावेळी त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले असून त्यानंतर नाल्याच्या बांधकामाबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन रहिवाशांना दिले.
स्थानिकांना विश्वासात न घेता खासगी जागेतून नाल्याचे बांधकाम करण्यात आल्याने आनंदनगर-वडगाव येथील नागरिकांनी आक्षेप घेतला. सातबारा उतारा, कॉमन पीटीशीट अथवा बुडा लेआऊट नकाशामध्ये कुठेही नाल्याची नोंद नाही. परंतु, मागील पुढील विचार न करता नाल्याच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आले. खुल्या जागेत चार फूट तर ज्या ठिकाणी घरांचे बांधकाम आहे, त्या ठिकाणी आठ फूट जागा जबरदस्तीने घेतली जात असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला होता.
बुधवार दि. 1 रोजी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी अनगोळ येथील नाल्याची पाहणी करत कंत्राटदाराला काम थांबविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा नागरिकांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन नाल्याच्या बांधकामाबाबत विचारणा केली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशनदेखील उपस्थित होते. सर्व प्रकरण ऐकून घेत पालकमंत्र्यांनी स्थानिकांना काही सूचना केल्या. महानगरपालिका तसेच संबंधित इतर विभागांची एक बैठक घेतली जाणार असून त्यानंतर नाल्याच्या बांधकामाचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. काँग्रेसच्या नेत्या प्रभावती मास्तमर्डी यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली. या बैठकीला वडगाव परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









