पंजाबच्या तुरुंगात आहेत कैद : लाहोर न्यायालयात सुनावणी
वृत्तसंस्था/ लाहोर
पाकिस्तानातील न्यायालयाने इम्रान खान यांच्या 120 हून अधिक समर्थकांची मुक्तता करण्याचा आदेश शनिवारी दिला आहे. 9 मे रोजी माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक झाल्यावर भडकलेल्या हिंसेनंतर या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. लाहोर उच्च न्यायालयाने सरकारला खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साप पक्षाच्या 123 कार्यकर्त्यांची तत्काळ मुक्तता करण्याचा आदेश दिला आहे.
पीटीआय नेते फारुख हबीब यांच्याकडून दाखल याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायाधीश अनवारुल हक यांनी हा आदेश दिला आहे. फैसलाबाद येथे अटक करण्यात आलेले हे कार्यकर्ते पंजाबमधील अनेक तुरुंगांमध्ये कैद आहेत.
पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच आंदोलकांनी रावळपिंडीमध्ये सैन्य मुख्यालयावर हल्ला केला होता आणि लाहोरमध्ये कोर कमांडर हाउसला (जिन्ना हाउस) आग लावली होती. हिंसक घटनांमध्ये 10 जण मृत्युमुखी पडल्याचा दावा पोलिसांनी केला होता. तर सुरक्षा जवानांच्या गोळीबारात 40 कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा इम्रान खान यांच्या पक्षाने केला आहे. तपास यंत्रणांनी पूर्ण पाकिस्तानात 7 हजारांहून अधिक पीटीआय कार्यकर्त्यांना अटक केली आहे, यातील 4 हजार जण पंजाबमधील आहेत.
शेकडो महिलांचा घेतला जातोय शोध
9 मे रोजी झालेल्या हिंसेशी निगडित सुमारे 138 प्रकरणांमध्ये 500 हून अधिक महिलांचा शोध घेतला जात असल्याची माहिती पंजाबचे काळजीवाहू मुख्यमंत्री मोहसिन नकवी यांनी दिली आहे. पुरुष अधिकाऱ्यांना महिलांना अटक न करण्याचा निर्देश देण्यात आला आहे, परंतु सैन्य संस्थांमध्ये तोडफोड करणाऱ्यांना अटक करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.









