दापोली नगरपंचायत निवडणूक, प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती नमूद; वासिम मुकादम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती तक्रार
दापोली प्रतिनिधी
दापोली नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 अंतर्गत नामनिर्देशनासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात माहिती अपूर्ण व लपवून ठेवल्याने तसेच चुकीची माहिती नमूद केल्याने 3 नगरसेवकांविरोधात येथील सामाजिक कार्यकर्ते वासिम मुकादम यांनी जिल्हाधिकाऱयांकडे तक्रार केली होती. याची दखल घेत जिल्हाधिकाऱयांनी तीनही नगरसेवकांविरोधात पोलिसांत तकार दाखल करण्याचे आदेश नगर पंचायत पशासनाला दिले आहेत. यामुळे खळबळ उडाली आहे.
येथील नगर पंचायतीमधील सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक खालिद रखांगे, सै. बोत्रे व शिवसेनेचे गटनेते रवींद्र क्षीरसागर यांच्याविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली होती. उमेदवाराने नामनिर्देशन अर्जासोबत सादर केल्या जाणाऱया शपथपत्रामध्ये प्रत्येक रकाना भरणे गरजेचे असतानाही खालीद रखांगे यांनी सादर केलेल्या शपथपत्रात अनु. क्र. 10 स्थावर मालमत्तेच्या विवरणात दोन रकाने असूनही केवळ शेतजमिनीचा उल्लेख केला व बिनशेती जमिनीच्या रकान्यात काहीच लिहिले नाही. तसेच शपथपत्रात बिनशेतीचा रकानाच दिसून येत नाही. यावरून रखांगे यांनी त्यांच्या नामनिर्देशन शपथपत्रामध्ये खोटी व चुकीची माहिती दिलयाची तकार आहे.
क्षीरसागर यांनी भूमापन क्र. 739/अ/11 या मिळकतीमध्ये एकूण 3 खरेदीखते केली असताना व आजही सदरची मिळकत क्षीरसागर यांच्या नावे असताना त्यांनी जाणीवपूर्वक ते शपथपत्रामध्ये नमूद केलेले नाही. त्यामुळे ते बेकायदेशीर असल्याचे तकारीत म्हटले होते. नगरसेविका बोत्रे यांनी स्वत:सह पतीच्या वैयक्तिक आणि संयुक्त स्थावर मिळकती असताना जाणीवपूर्वक नमूद केलेल्या नाहीत. बोत्रे यांच्या नावे असलेल्या मिळकतीची सरकारी किंमतही जास्त असून शपथपत्रामध्ये अपूर्ण व चुकीची माहिती दिली आहे. बोत्रे यांनी पोस्ट आळीतील घरात शौचालय असल्याचा दाखला जोडला, मात्र हे घरच पतिज्ञापत्रात नमूद केले नाही. त्यामुळे ते बेकायदेशीर असल्याने बोत्रे यांनी लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 अन्वये गुन्हा केला आहे. त्यामुळे या तिन्ही नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी वासीम मुकादम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्जाद्वारे केला होती.
या बाबत जिल्हाधिकाऱयांनी नगर पंचायतीला पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे की, संबंधित तीनही नगरसेवकांनी सार्वजनिक नामनिर्देशन पत्राच्या प्रतिज्ञापत्रात सर्व मालमत्तेचा तपशिल भरल्याचे दिसून येत नाही. राज्य निवडणूक आयोगाकडील 20 परिपत्रकान्वये त्यांनी शपथपत्र अथवा घोषणापत्रात चुकीची माहिती दिल्याबाबत अहवालानुसार खात्री करण्यात आली आहे. यास्तव रवींद्र क्षीरसागर, खालीद रखांगे, सौ.बोत्रे यांच्याविरोधात राज्य निवडणूक आयोगाच्या परिपत्रान्वये भारतीय दंड संहितेच्या कलम 171 जी व कलम 181 या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात यावा, असे आदेश जिल्हाधिकाऱयांनी नगर पंचायत प्रशासनाला दिला आहे. या बाबतचा अहवाल तत्काळ पाठवण्याचे निर्देशही दिले आहेत. या बाबत नगर पंचायत कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.