महानगरपालिका आयुक्तांनी घेतला विकासकामांचा आढावा : अधिकाऱयांची घेतली झाडाझडती
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेच्यावतीने शहरात विविध विकासकामे राबविण्यात येत आहेत. पण बहुतांश कामे अर्धवट असल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. कामे अर्धवट असल्याने बिले रखडली आहेत. त्यामुळे अर्धवट कामाबद्दल महापालिका आयुक्तांनी अभियंत्याची झाडाझडती घेतली. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचा आदेश बजावला.
महापालिकेच्यावतीने राबविण्यात येणाऱया विकासकामांचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त रूद्रेश घाळी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याची बैठक मंगळवारी घेतली. यावेळी पूर्ण झालेल्या कामाची माहिती जाणून घेऊन प्रलंबित कामाचा आढावा घेतला. कोरोनामुळे दोन वर्षे शासनाकडून निधी मंजूर झाला नाही, अशातच नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. तर मंजूर झालेली विकासकामे पूर्ण करण्याकडे अधिकाऱयांचे दुर्लक्ष झाले आहे. 25 कोटी अनुदानाअंतर्गत तसेच 15 व्या वित्त आयोग अनुदानामधून शहरात विविध विकासकामे करण्यात येत आहेत. गटारीचे बांधकाम, रस्त्यांचे डांबरीकरण, डेनेज वाहिन्या बदलण्याचे काम आणि अन्य विकासकामे राबविण्यात येत आहेत. पण बहुतांश कामे अर्धवट स्थितीत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शहरात डेनेज वाहिन्या घालण्याचे काम अर्धवट असल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. परिणामी नागरिकांना कसरत करावी लागत आहे. आयुक्तांनी कामाचा आढावा घेऊन अर्धवट कामाबद्दल अभियंत्यांची झाडाझडती घेतली. कंत्राटदाराकडून कामे पूर्ण का करवून घेतली नाहीत? असा मुद्दा उपस्थित केला.
कामे अर्धवट राहिल्याने बिले रखडली आहेत. त्यामुळे पावसाळय़ापूर्वी प्रलंबित कामे पूर्ण करण्याची सूचना केली. जी कामे अद्याप सुरू करण्यात आली नाहीत, ती कामे तातडीने हाती घेऊन वेळेत पूर्ण करण्याचा आदेश महापालिका आयुक्त रूद्रेश घाळी यांनी अभियंत्यांना बजावला. कामे पूर्ण झाली नसल्याने कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा आयुक्तांनी दिला.









